यवत : येथील सुमतिनाथ जैन श्वेतांबर ट्रस्टचे माजी अध्यक्ष संजय हिंमतलाल शहा (वय ५०, यवत, ता. दौंड) यांना मंदिरातील हिशेबाच्या कारणावरून समाजातील काहींनी वेळोवेळी त्रास देऊन शिवीगाळ, दमदाटी व जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. या घटनेला तब्बल १५ दिवस उलटले तरी अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल केलेले सहा आरोपी फरार आहेत.या प्रकरणी मृत संजय शहा यांचे भाऊ विजय हिंमतलाल शहा यांनी यवत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ६ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. आरोपी कुमार मणिलाल गांधी, धीरज कुमार गांधी, धवल कुमार गांधी, मिलिंद कुमार गांधी, जितेंद्र मणिलाल शहा, भूपेंद्र मणिलाल शहा (सर्व रा. यवत, ता. दौंड) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील आरोपींनी ट्रस्टचे माजी अध्यक्ष संजय हिंमतलाल शहा यांना वेळोवेळी त्रास देऊन शिवीगाळ, दमदाटी व जिवे मारण्याची धमकी दिली होती. दि. १५ रोजी रात्री आठच्या सुमारास वरील आरोपींनी संजय शहा यांच्याकडे चिठी पाठवून हिशेब देण्याची मागणी केली होती. यानंतर दुकानासमोर लाठ्याकाठ्या घेऊन त्यांना मारण्यासाठी आरोपी आले होते. त्याच वेळी संजय शहा यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले होते; परंतु त्या वेळी तेथे मोठी गर्दी जमा झाली. काहींनी मध्यस्थी केल्यानंतर भांडण सोडविले होते. परंतु, भांडणाचा त्रास सहन न झाल्याने संजय शहा यांनी यवत गावाच्या हद्दीत पुणे- सोलापुर रेल्वेमार्गावर आत्महत्या केली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन १५ा दिवस उलटले. मात्र, आरोपी अजूनही मोकाटच आहेत. त्यांना अजून अटक का झाली नाही, असा प्रश्न संजय शहा यांचे कुटुंबीय विचारत आहेत. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना भेटून त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना पकडून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. मात्र, एवढे दिवस उलटले तरी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचललेली नाहीत.(वार्ताहर)
आत्महत्येस प्रवृत्त करणारे फरारीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2015 23:53 IST