पिंपरी : पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते विनोद नढे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईला आव्हान देण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे धाव घेण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर मात्र आम्हाला निलंबन कारवाईचे पक्षश्रेष्ठींचे पत्र मिळाले नाही. त्यामुळे कारवाईचा हा केवळ दिखावा असल्याचा दावा भोईर, नढे यांनी केला आहे. प्रदेशाध्यक्षांनी विभागीय आयुक्तांना निलंबनाबाबत पत्रव्यवहार केला आहे, अशी पुष्टी देत निलंबनाचे पत्रच मिळाले नव्हते, तर धावपळ कशासाठी केली, असा प्रश्न शहराध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला आहे. १५ दिवसांपुर्वी शहर काँग्रेसमधील दोघांवर निलंबनाची कारवाई झाली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या सहीचे पत्र विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांना दिले. त्यामध्ये १३ फेब्रुवारीला पक्षातर्फे भाऊसाहेब भोईर, विनोद नढे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असल्याचे नमूद केले आहे. असे असताना निलंबन कारवाईचे पत्र प्रदेश सरचिटणीस अभिजीत देशमुख यांनी कसे दिले, असा प्रश्न निलंबन कारवाई झाली त्यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे निलंबन कारवाईचे पत्रच मिळाले नाही, असा दावा केला. तर दुसरीकडे निलंबन कारवाईचे पत्र प्रदेशाध्यांच्या सहीने दिलेले नाही, तर प्रदेश सरचिटणीस यांच्यामार्फत तयार केले आहे अशा स्वरूपाच्या त्यांच्या वक्तव्यातून विसंगती दिसून येते. निलंबन कारवाईचे पत्र सध्या मिळाले नसले, तरी टपालाने रीतसर हाती पडणार आहे, असे शहराध्यक्ष साठे यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
निलंबनानंतरही काँग्रेसमध्ये धुसफूस
By admin | Updated: February 25, 2015 00:35 IST