खेड-कनेरसर या रस्त्यादरम्यान मांडवळा -रेटवडी येथे रस्त्यालगत गॅसलाईन गाडण्याचे काम सुरू आहे. रस्त्यालगत खोदकाम करण्यात आले. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याला पाणी आल्यामुळे गळतीचे पाणी ओढ्याला येते. हे पाणी पूर्वी रस्त्याच्या कडेला सिमेंटीनळीद्वारे ओढ्यात सोडण्यात येत होते. काही दिवसांपूर्वी या रस्त्यालगत गॅसलाईनचे खोदकाम करण्यात आले होते. खोदकामात पाणी जाणाऱ्या सिमेंटी नळ्या जेसीबीच्या साह्याने फुटून गेल्या. गॅसलाईनच्या ठेकेदाराने त्या पुन्हा नवीन किंवा दुरुस्त न करता तशीच गॅसचे लोखंडी पाईप गाडून पाईपलाईन पुढे नेली. खेडच्या पूर्व भागात सेझ प्रकल्प आल्याने या ठिकाणी विविध कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. अनेक कंपन्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. तसेच कंपनी कामगारांच्या बसेस, कंपन्यातील मालाची गाड्याची ये-जा सुरू असते. रेटवडी, कनेरसर येथे जाण्यासाठी महत्वाचा रस्ता आहे. गेल्या चार दिवसांपासून या रस्त्यावर धो धो पाणी सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना येथून वाहन धोकादायकरीत्या न्यावे लागत आहे. दुचाकीस्वारांना मोठी कसरत या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या चार दिवसांत अनेक दुचाकीस्वार पाण्यामुळे घसरून जखमी झाले आहे. नवीन येणाऱ्या वाहनचालकास या रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर पाणी येत असल्याने रस्त्यांची ही वाट लागली आहे.सतत येत असलेल्या पाण्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे पाणी असेच चालू राहिले तर रस्त्याची दुरवस्था होण्यास वेळ लागणार नाही व अपघातास ही
निमंत्रण मिळणार आहे. या रस्त्यावर येणाऱ्या पाण्याची योग्य प्रकारे गटारे व सिमेंटीनळ्या टाकून पाणी काढून द्यावे, अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांनी केली आहे.
खेड ते कनेरसर रस्त्यावर गॅसलाईनच्या खोदाईमुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अपघात होत आहे.