रहाटणी : शहरातील अनेक इच्छुक उमेदवार आपापल्या परीने कामाला लागले आहेत. मलाच पक्ष उमेदवारी देणार या आविभार्वाने अनेक इच्छुक तितक्याच जोमाने प्रचार करीत असले, तरी अनेक राजकीय पक्षांकडून सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. ज्या उमेदवाराकडे निवडून येण्याची क्षमता आहे अशाच उमेदवारांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच अनेक पक्षांत सुरू आहे. २०१७ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत पक्षावरील निष्ठेपेक्षा उमेदवाराची निवडून येण्याची ताकत आजमावली जाणार असल्याने सर्वच इच्छुक कामाला लागले आहेत. तर पक्षाकडून अशा उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. काही राजकीय पक्षांनी तर उमेदवारीबाबत प्रभागनिहाय सर्वेक्षण सुरू केले आहे. जो इच्छुक उमेदवार यात इतरांपेक्षा सरस ठरेल, त्यालाच उमेदवारी मिळण्याचे संकेत काही राजकीय पक्षांनी इच्छुकांना दिले असल्याने सर्वच इच्छुक उमेदवार पक्षाच्या कामाला लागले आहेत. हे सर्वेक्षण पक्ष करणार; मात्र खर्च त्या त्या प्रभागातील इच्छुकांनी पक्षाकडे अदा करावयाचा आहे. अनेक इच्छुकांनी जातिनिहाय, कॉलनीनिहाय, तरुण-ज्येष्ठ, तसेच ओळखणारे किती असे अनेक प्रकारचे सर्वेक्षण केले आहे. त्यामुळे पक्षाचे सर्वेक्षण म्हणजे भुर्दंड अशी काही इच्छुकांची भावना झाली आहे. दरम्यान, बँकांभोवती नागरिक गर्दी करीत आहेत. त्यांना पाण्याच्या बाटल्या देऊन इच्छुक छुप्या पद्धतीने प्रचार करीत आहेत. (वार्ताहर)
उमेदवारांची चाचपणी सुरू
By admin | Updated: November 16, 2016 02:26 IST