कोरोनाचे निर्बंध सरकारने काढून घ्यावेत, अशी आता फक्त व्यापारी, दुकानदारांचीच इच्छा नाही तर सर्वसामान्यांचेही हेच मत बनत चालले आहे. एकीकडे लसीकरणाची टक्केवारी वाढत आहे. कोरोना मृत्यूचे आणि कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे आता कोरोनासोबत जगण्यास शिकले पाहिजे असे जनमत आहे. लोकप्रतिनिधी हीच भूमिका सरकारच्या कानावर घालत आहेत. मात्र केंद्र व राज्य सरकार अजूनही कोरोना संसर्गाची तिसरी लाट येईल की काय ही शक्यता गृहीत धरून पावले उचलत आहे. त्यामुळे सरकार आणि सर्वसामान्य यांच्या विचारात अंतर पडले आहे. साप्ताहिक कोरोना आढावा बैठकीत याचे प्रदर्शन होते. सगळ्या बाबी एकामागून एक खुल्या होत असताना पोहण्याचे तलाव आणि अन्य क्रीडा प्रकारांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. त्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी मास्क नाही वापरला तर काय परिणाम होतात हे आपण पाहिले आहे. अनलाॅक करताना मास्क वापरणे व कोरोना नियमांचे काटेकोर पालन केलेच पाहिजे.” स्विमिंग असोसिएशननेही आता स्विमिंग पूल सुरू करण्याची मागणी केलीय. पण मग काय मास्क घालून स्विमिंग करणार का, असा प्रश्नच अजित पवारांनी केला. अर्थातच त्यावर पत्रकार आणि लोकप्रतिनिधी या सर्वांचीच बोलती बंद झाली.
दादांच्या प्रश्नावर सगळ्यांचीच बोलती बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:16 IST