नीरा शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. ग्रामीण भागात वाढलेली वाहनांची संख्या, तसेच कोरोनामुळे सार्वजनिक वाहतुकीचा कमी झालेला वापर यामुळे लोक खाजगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. शहरात आलेले लोक वाहने पार्किंग करताना वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता रस्त्यावर वेड्या वाकड्या पद्धतीने वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. त्याच बरोबर सध्या साखर कारखाने सुरु झाल्याने सकाळी व संध्याकाळी ऊस वाहतूक करणारी वाहने बाजार पेठेतूनच जात असतात.
बेशिस्त पार्किंगमुळे या वाहनांना अडथळा निर्माण होऊन वाहतूककोंडी होते. त्यामुळे पोलिसांनी आता नीरा शहरात पुन्हा एकदा सम विषम पार्किंग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी बुधवारी नीरा शहरास भेट देऊन वाहतूक कोंडीच्या समस्येचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी नीरा शहरात लवकरच समविषम पार्किग सुरु करणार असल्याचे सांगितले.
चौकट :
पाच वर्षापूर्वी नीरेची मुख्य बाजारपेठ असलेला छ.शिवाजी महाराज चौक ते बुवासाहेब चौका दरम्यानचा रस्त रुंदीकरण फुटपाथसह झाला. दोन वर्षपुर्वी ग्रामपंचायतीने रस्त्यावर बेशिस्त पार्किंगमुळे सम - विषमचे फलक लावले. मात्र पोलीसांकडून अंमलवजावणी करताना राजकीय हस्तक्षेप वाढल्याने कारवाई करण्यात पोलीसांना अडचणी निर्माण झाल्या. आता नव्याने आलेल्य पोलिसांनी पुन्हा बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्याचा विडा उचलला आहे.