पुणे : कचरा वाहतुकीसाठी जेसीबी व हायवा टिपर पुरविण्याकरिता जादा रकमेचे टेंडर आल्यानंतरही प्रशासनाने रेट अॅनालिसीस घेतले नाही. तसेच बीड कपॅसिटी मागविली नाही. दोनच निविदा उरल्यानंतर टेंडरला मुदतवाढ देणे आवश्यक असताना दिली नाही. त्यामुळे पालिकेचे नुकसान होणार असल्याने ही टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.शहरातील कचरा वाहतूक करण्यासाठी महापालिकेच्या हद्दीत व हद्दीबाहेर भाडेतत्त्वावर जेसीबी व हायवा पुरविण्यासाठी टेंडर मागविले होते. त्या वेळी आलेल्या ३ टेंडरपैकी बालाजी अर्थमूव्हर्स या कंपनीस प्रति महिना ९६ हजार ९९९ रुपये किमतीने जेसीबी तर हायवा टिपर प्रतिमहिना १ लाख ४९ हजार रुपये किमतीने पुरविण्याचे १ कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये यावर निर्णय होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही टेंडर प्रक्रियाच चुकीच्या पद्धतीने राबविल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी केला आहे.कचरा वाहतुकीचा ठेका घेण्यासाठी ३ टेंडर आले होते. त्यापैकी एकाने बयाणा रकमेची एफडीआर टेंडर उघडण्याअगोरदच बँकेत जमा केल्याने त्याला अपात्र ठरविणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता अंबरनाथ अर्थमूव्हर्स या ठेकेदारास बोलावून टेंडर उघडल्यानंतर बयाणा रकमेचा एफडीआर परत मिळाल्याची स्वाक्षरी घेण्यात आली व पुढील कार्यवाही करण्यात आली असा आरोप बालगुडे यांनी केला आहे. टेंडर काढताना आलेले दर हे ८ तासांसाठी ठरविले आहेत. डंपर कामाच्या ठिकाणी पोहोचल्यापासून तास मोजले जाणार आहेत. गाडी कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर भरण्यास वेळ लागणे स्वाभाविक आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाचे तास कमी होणार आहेत. तसेच भरलेला डंपर खाली करण्यास ८ तासांपेक्षा जास्त वेळ लागल्यास त्याचे जास्तीचे पैसे ठेकेदाराकडून आकारले जाणार आहेत. ८ तासांच्या कालावधीमध्ये डंपर किती खेपा करणार हे नमूद करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
कचरा वाहतूक टेंडर प्रकियेत त्रुटी
By admin | Updated: May 18, 2015 05:48 IST