पुणे : गणेशोत्सव येत्या आठवड्यात सुरू होणार असून, नेहमीप्रमाणे नदी प्रदूषणाचा मुद्दा पुढे येतो. अनेक कारणांनी नद्या प्रदूषित होत आहेत. त्यांना स्वच्छ ठेवायचे असेल, तर प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. पूर्वी स्वच्छ पाणी असल्याने त्यात मूर्तीचे विसर्जन योग्य होते, पण आता घाण पाण्यात विसर्जन योग्य नाही. तसेच प्रदूषणात भर पडू नये म्हणून मूर्तीदान करणे किंवा घरीच विसर्जन करणे काळाची गरज आहे. त्यासाठी ‘जीवितनदी’ तर्फे जनजागृती करण्यात येत आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असल्यास ती पुढील वर्षी नैसर्गिक रंगाने रंगवून परत वापरता येते. अथवा मनपाच्या हौदात विसर्जन करायला हवे. प्रतीकात्मक सुपारीचे विसर्जन करता येऊ शकते. तुरटी अथवा अमोनिअम बाय कार्बोनेट पावडरचा वापर केल्यास ते पाणी कुठल्याही नैसर्गिक स्रोतमध्ये जाऊ देऊ नये. माती, शाडू, कागद, शेणाची मूर्ती तयार केली असली तरी त्यात इतर रासायनिक रंगांचा वापर होत असल्याने ते नदीसाठी घातक आहे.
धातू अथवा, लाकूड, कागद, नैसर्गिक दगड यांची कायमस्वरुपी मूर्ती बसवून हा सण साजरा करता येऊ शकतो. त्यासाठी अधिकाधिक जनजागृती व्हायला हवी. घरात गणरायांसाठी पर्यावरणपूरक सजावट करावी, सजावटीचा पुनर्वापर करण्यावर भर हवा, असे आवाहन जीवितनदीतर्फे करण्यात आले आहे.
——————————————
गणेश मंडळंासाठी आवश्यक
- मोठ्या मूर्ती विसर्जित न करता हौदात कराव्यात
- मूर्तीचा पुनर्वापर करता येत असेल तर करावा
- प्रतीकात्मक सुपारीचे विसर्जन करायला हवे
- निर्माल्य आणि सजावटीच्या वस्तू मनपाकडे द्याव्यात
—————————-