लोकमत न्यूज नेटवर्कखोडद : फार पूर्वीपासून पर्यावरणातील काही वृक्षांना देवांची नावे देऊन या वृक्षांचा ‘देववृक्ष’ म्हणून उल्लेख होऊ लागला तसेच या वृक्षांना देवासमान ‘स्थान’ही मिळाले. पूर्वीपासूनच पिंपळ, उंबर, वड, कडूनिंब आदी वृक्षांना जळाऊ लाकूड म्हणून न वापरता त्यांची पूजाअर्चा करून संरक्षण केले जाऊ लागले आणि तेव्हापासूनच पर्यावरणातील काही वृक्ष आजही सुरक्षित आहेत. नैसर्गिक दृष्टिकोन ठेवून आणि पर्यावरणाबाबत सकारात्मक विचार केल्यास वृक्षांना दिलेली देवांची जोड पर्यावरणाच्या दृष्टीने नक्कीच हितकारक ठरत आहे.सध्याच्या काळात औदुंबराचे स्थान असलेला उंबर, मुंजोबाचे स्थान असलेला पिंपळ, महादेवाचे प्रिय पर्ण असलेले बेलाचे झाड, गुढी पाडव्यासाठी कडूनिंब, शुभकायार्साठी अग्रस्थानी असलेला आंबा, वटपौर्णिमेला दीर्घायुषी म्हणून ओळखला जाणारा वड या सर्वच वृक्षांना मानवी जीवनात व सणावारांत महत्त्वाचे स्थान असल्याने व त्यांचे दैवतीकरण झाल्याने हे वृक्ष आजही काही प्रमाणात देवनामांमुळे सुरक्षित आहेत.अवघ्या विश्वाला शांततेचा, प्रेमाचा, मित्रत्वाचा, बंधुत्वाचा, समतेचानआणि संतुलित नैसर्गिक पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या महामानव तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्या ‘जोडशालवृक्षा’खाली म्हणजेच ‘सालवृक्षा’खाली झाला, असा विशेष महत्त्व असणारा हा सालवृक्ष महाराष्ट्रात तरी दुर्मिळ आहे. तथागत बुद्धांनी जीवनप्रवासात वने व वनांमधील वृक्षांना महत्त्वाचे स्थान दिले आहे.सप्तपर्णी, पळस, पाटला, पिंपर्णी, मोई, नागचाफा, अर्जुन, शोण (टेटू), सरल, कडूनिंब, वेळू, सोनचाफा, मुचकंद, बीजा (बिवला), आवळा, आंबा, जोडशाल (साल), शिरीष, उंबर, वड, पिंपळ, कदंब, जांभूळ हे सर्व वृक्ष पक्षी, प्राणी व मानव यांना उपयुक्त व औषधी आहेत. या वृक्षांमुळे पक्षी, प्राणी व मानवाची अन्न व निवारा गरजा भागत होत्या; मात्र अलीकडच्या काळात हे वृक्ष पर्यावरणातून कमी होऊ लागले आहेत, ही चिंतेची व गंभीर बाब आहे.तथागत गौतम बुद्धांचा जन्म, त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास आणि त्यांचे महापरिनिर्वाण या सर्व महत्त्वपूर्ण घटना वनांमध्येच घडल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तथागतांचा जन्म व महापरिनिर्वाण देखील याच ‘सालवृक्षा’खालीच झाले. तथागत गौतम बुद्धांच्या जीवनात पर्यावरणाला आणि वृक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
देवनामांमुळे पर्यावरणातील वृक्ष आजही सुरक्षित
By admin | Updated: May 10, 2017 03:44 IST