पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) दिल्या जाणा-या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी बुधवारपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. मात्र, अर्ज भरताना स्वत:च्या घराचे गुगल लोकेशन अचूक टाकावे, अन्यथा अर्जांची छाननी करताना अर्ज बाद होतील, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून प्रवेशासाठी येत्या ३ ते २१ मार्च या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. राज्यात आरटीई प्रवेशाच्या ९६ हजार ५९७ जागा असून त्यात पुणे जिल्ह्यातील १४ हजार ७४१ जागांचा समावेश आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.
प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर म्हणाले, आरटीई अंतर्गत प्रवेश करून देतो, असे सांगून पालकांची फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे पालकांनी केवळ शासनाच्या नियमावलीनुसार प्रवेश प्रक्रियेला सामोर जावे. तसेच अर्जात अचूक पत्ता टाकावा. शाळा व घर यांच्यातील अंतराची मर्यादा विचारात घेऊन शाळांची निवड करावी.
आरटीई प्रवेशासाठी आवश्यक कादगपत्रे जमा करून ठेवावीत, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले होते. त्यामुळे अनेक पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज भरता येईल. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शिक्षण विभागातर्फे मदत केंद्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत.