पुणे : कोरोना व मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे राज्यातील पुण्यासह प्रमुख महापालिकांमधील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबली. जानेवारी महिना उजाडला तरीही प्रवेश प्रक्रिया सुरू असून प्रत्यक्षात अकरावीचे वर्ग केव्हा सुरू होणार?, यंदा अभ्यासक्रम किती असणार?, परीक्षा केव्हा घेतल्या जाणार? याबाबत शासनाने अद्याप कोणतीही स्पष्टता न दिल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, अशी मागणी केली जात आहे.
कोरोनामुळे दहावीचा निकाल प्रसिध्द करण्यास विलंब झाला. परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. परंतु, केवळ पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवेश ऑफलाइन पद्धतीने दिले आहेत. तसेच राज्य शासनाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने शहरातील अकरावीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले नाहीत. त्यातही शासनाने शाळा सुरू करण्यास मान्यता दिली असली तरी; शिक्षकांच्या उपस्थितीची मर्यादा ५० टक्केच ठेवली आहे. त्यामुळे काही ठिकाणी शाळा सुरू पण शिक्षक नाही, असे चित्र दिसून येत आहे.
अकरावीमध्ये प्रवेश घेतल्या विद्यार्थ्यांचे वर्ग कनिष्ठ महाविद्यालयांनी सुरू करावेत. त्यासाठी शिक्षण विभाग व शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या नियमावलीचे पालन करणे अपेक्षित आहे. परंतु, अद्याप शहरातील नामांकित महाविद्यालयांचेसुध्दा अकरावीचे वर्गच सुरू झाले नाहीत.