- मनोहर बोडखे, दौंड
दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर विद्युत इंजिनची रेल्वेगाडी कधी धावणार ही लोकांना कित्येक वर्षांची उत्कंठा. अखेर आज तो योग आला. तब्बल १५० वर्ष जुन्या असलेल्या पुलावरून ही विद्युत इंजिनची रेल्वे जाताना पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. हा क्षण डोळ््यांत साठवण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. शनिवारी (दि. १५) विद्युत इंजिनसह रेल्वेगाडी धावली. या रेल्वेचे मनमाड ते दौंड दरम्यान कोपरगाव, श्रीरामपूर, अहमदनगर स्थानकावर स्वागत झाले. दौंड-मनमाड मार्गावर विद्युत इंजिन सुरू झाल्याने इंधनाची आणि वेळेचीदेखील बचत होणार आहे. एरवी साडेपाच तासांत दौंड ते मनमाड धावणारी सुपरफास्ट प्रवासी गाडीला साडेचार तास व पॅसेंजर गाड्यांना सहा तास लागेल.सुमारे दिडशे वर्षांपूर्वी दौंड ते मनमाड हा लोहमार्ग विस्तारीत झाला. त्यानंतर वर्षभरात भीमा नदीवर ब्रिटिशकालीन पूल उभारला गेला. या पुलांमुळे उत्तर भारत ते दक्षिण भारत हा लोहमार्ग जोडला गेल्याने जवळजवळ भारतातील विविध ठिकाणच्या रेल्वे दळणवळणासाठी दौंडचा ब्रिटिशकालीन पूल महत्त्वाचा ठरला आहे. १९५३ला मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वेगाडी लोहमार्गावर धावली. कालांतराने मुंबई ते पुणे त्यानंतर पुणे ते सोलापूर असा रेल्वेमार्ग विस्तारीत झाला. इंजिनाचे तिसरे पर्वपुणे ते दौंड व्हाया मनमाड या रेल्वे मार्गावर विद्युत इंजिनाच्या माध्यमातून तिसरे पर्व सुरू झाले आहे. सुरुवातीला कोळशाचे स्टीम इंजिन होते. हे इंजिन दौंड ते मनमाड या मार्गावर ११० वर्षे धावले तर ४० वर्षे डिझेल इंजिन धावले. दीडशे वर्षांच्या परंपरेनंतर आता विद्युत इंजिन धावायला सुरुवात झाली. तेव्हा स्टीम, डिझेल आणि विद्युत असे तीन इंजिनाची या लोहमार्गाला परंपरा लाभली. त्याचबरोबरी या तिन्ही इंजिनाच्या आवाजाची वेगवेगळी परंपरा आहे. तेव्हा आता डिझेल इंजिनचा आवाज जवळजवळ बंद होईल. त्यानुसार विद्युत इंजिनाच्या आवाजाचे पर्व सुरू झाले आहे.