निमगाव केतकी : निमगाव केतकीनजीक इंदापूर-बारामती मार्गालगत असणाऱ्या महावितरणच्या विद्युत रोहित्राला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली. शनिवारी (दि. २१) दुपारी चारच्या सुमारास आग लागली. हे रोहित्र सतीश राऊत यांच्या शेतामध्ये असल्याने डेपोच्या खाली असणाऱ्या डाळिंबबागेला काही प्रमाणात आग लागली. सतीश राऊत या शेतकऱ्याच्या शेतीमधील काही डाळिंबझाडे आगीमध्ये होरपळली आहेत. त्या झाडांची पाणीपुरवठा करणारी ठीबक सिंचन या आगीमध्ये जळालेली आहे. त्यामुळे राऊत यांचे नुकसान झाले आहे.आग दुपारी चारच्या सुमारास लागली. महावितरणचे कर्मचारी त्या ठिकाणी तत्काळ येणे गरजेचे असतानासुद्धा तिथे कर्मचारी लवकर फिरकले नाहीत. सायंकाळी सहाच्या सुमारास तिथे महावितरणचे कर्मचारी आले. बागेत आग लागल्याचे वृत्त राऊत यांना रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी सांगितले. त्यानंतर राऊत यांनी त्या ठिकाणी येऊन आग विझविली. त्यामुळे अनर्थ टळला.महावितरणचे कनिष्ठ अभियंता गावडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. सुट्टी असल्याने सोमवारी स्पॉटची पाहणी करून पंचनामा केला जाईल. नंतर विद्युत रोहित्र सुरू केले जाईल.(वार्ताहर)
शॉर्ट सर्किटमुळे विद्युत रोहित्र जळाले
By admin | Updated: January 24, 2017 01:32 IST