पाटस : कुसेगाव (ता. दौंड) परिसरातील भोसलेवाडी येथे वैशाली उमेश मोकाशी (वय २४, रा. भिवडी, ता. पुरंदर) या महिलेने आपल्याला मुली झाल्या तसेच यापुढे मुलगा होण्याची शक्यता नाही असे वाटल्याने नैराश्येपोटी तीन मुलींना मारून स्वत: आत्महत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे़ वैशाली मोकाशी हिने काल जुळ्या मुलींचा गळा आवळून त्यांचा खून केला व घरातील न्हाणीघरामध्ये पाण्याने भरलेल्या एका पातेल्यात त्यांचा मृतदेह ठेवून दिला होता़ त्यानंतर पहिल्या मुलीला घेऊन तिने एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती़ वैशाली ही गेल्या चार महिन्यांपूर्वी बाळंतपणाला माहेरी आली होती. दरम्यान, तिने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला, तर तिला यापूर्वीही एक मुलगी झालेली आहे. तेव्हा मला तिन्ही मुलीच झाल्या़ त्यातील एक तरी मुलगा हवा होता, असे ती वारंवार आपल्या माहेरकडच्या लोकांना सांगत होती. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बाळंतपणात जुळ्या मुलींमुळे तिचे सिझरीन करावे लागले होते़ त्यामुळे आता तुला मुलगा होणार नाही, असे तिला भेटायला आलेल्या महिलांपैकी काहींनी सांगितल्याने ती निराश झाली होती़ त्यातून तिने हा प्रकार केला असावा़ तिचे पती व इतरांशी चांगले संबंध होते़ घटना घडली, त्या दिवशी तिचे आईवडील आणि पतीबरोबरच एका कार्यक्रमाला गेले होते, असे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले़ (वार्ताहर)
आईच ठरली काळ
By admin | Updated: February 1, 2015 23:59 IST