चाकण / कुरुळी : निघोजे (ता. खेड) येथील एका आठवी पास बोगस डॉक्टरचा सोमवारी पर्दाफाश करण्यात आला असून, त्याने कोलकाता येथून दोन वर्षांचा खासगी कोर्स केल्याचे समोर आले आहे. येथे तीन वर्षांपासून आपले ‘दुकान’ थाटले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आज (दि.२३) त्याला खेड न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवस (दि.२६ सप्टेंबर पर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.येथील डोंगरवस्तीत या डॉक्टरने स्नेहा क्लिनिक उघडले होते. बी. सरकार या नावाने बिशन अरुण सरकार (वय ३२, रा. बालेवाडी फाटा, बाणेर, मूळ गाव बागूल, हंसखली जि. नादिया, पश्चिम बंगाल) याने येथे तीन बेडचे क्लिनिक थाटले होते. तसेच, रुग्णांना तपासून तो औषधोपचारसुद्धा करीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो प. बंगालमध्ये एका डॉक्टरकडे काम करीत होता. तेथे काही वर्षे काम केल्यानंतर कोलकाता येथे त्याने दोन वर्षांचा वैद्यकीय शिक्षणासंदर्भात खासगी कोर्स केला. त्यानंतर त्याने येथे आपले ‘दुकान’ थाटले. तीन वर्षे त्याने येथे क्लिनिक चालवले. या संदर्भात दिशा फाउंडेशनच्या डॉ. यामिनी आडबे व रामकुमार अगरवाल यांना संशय आल्यावर त्यांनी पोलिसांना तशी माहिती दिली. यानंतर पोलीस व चाकण वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वाघ यांनी त्या डॉक्टरकडे दोन बोगस रुग्ण पाठविले. त्यांनी त्याला पोटात दुखत असल्याचे सांगितले. त्याने त्यांना तपासून काही औषधे लिहून दिली; परंतु औषधाच्या चिठीवर कोठेही डॉक्टर व क्लिनिकचे नाव लिहिले नाही. त्यानंतर या पथकाने त्याच्यावर धाड टाकली असता, तो बोगस डॉक्टर असल्याची खात्री पटली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिली.पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बोगस असल्याचे मान्य केले. धक्कादायक म्हणजे तो आठवी पास असल्याचेही समोर आले. या बोगस डॉक्टराला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व औषधे जप्त करून क्लिनिकला टाळे ठोकण्यात आले आहे. तीन वर्षे हा आठवी पास डॉक्टर निघोजेकरांची फसवणूक करीत होता. चाकण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर पाटील पुढील तपास करीत आहेत.कोणतीही पदवी किंवा नोंदणी नसताना काही बोगस डॉक्?टर रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार या मुळे उघडकीस आला असून अशा सर्वच मुन्नाभाईंवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘त्या’ आठवी पास डॉक्टरला कोठडी
By admin | Updated: September 25, 2014 06:19 IST