पुणे : आवक वाढल्याने आणि मागणी घटल्याने गेल्या आठवड्यात वाढलेल्या खाद्यतेलाच्या भावात आज घट झाली. याबरोबर डाळी, साखर, गूळ, गोटा खोबरे यांच्या दरातही आज घट झाली. मात्र, तांदळाची मागणी जास्त असल्याने त्याचे भाव तेजीत होते. घाऊक बाजारात ग्राहकांची संख्या रोडावली आहे. आवक वाढलेली आणि मागणी कमी असल्याने विविध वस्तूंचे दर कमी झाले आहेत. भावात सर्वाधिक घट ही डाळींमध्ये नोंदविली गेली. मध्य प्रदेशातून मूगडाळीची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे मूगडाळीच्या भावात क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपयांची घसरण झाली. तर तूरडाळीच्या भावात २०० रुपयांनी, हरभरा डाळीच्या भावात १०० रुपयांनी घट झाली. हरभरा डाळीचा भाव घसरल्याने बेसनाचे दरही ५० रुपयांनी कमी झाले. डाळींबरोबर गुळाचे दरही क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांनी कमी झाले. गहू, ज्वारी आणि बाजरीची आवक गेल्या आठवड्याप्रमाणेच असल्याने त्यांचे दर स्थिर होते. मात्र, गेल्या आठवड्यात तेजीत असलेले तांदळाचे दर या आठवड्यातही तेजीत होते. आंबेमोहोर, कोलम, कालीमछ, लचकारी या तांदळास मागणी वाढल्याने आणि पश्चिम बंगाल आणि दक्षिणेकडील राज्यांमधून मागणी वाढल्याने भावात वाढ झाली आहे. क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांनी ही वाढ झाली आहे. साखरेची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, मागणी कमी असल्याने साखरेचे दर आज प्रति क्विंटलमागे ५० रुपयांनी घटले. आज घाऊक बाजारात साखरेचा प्रति क्विंटलचा दर ३ हजार रुपये होता. साखर कारखाने बंद झाल्याने ऊस गुºहाळाकडे वळला आहे. त्यामुळे गुळाचे उत्पादन वाढले आहे. मागणीही कमी असल्याने गुळाच्या दरात प्रति क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची घट झाली. आंतरराष्टÑीय बाजारात सोयाबीन व पामोलिन तेलाचे दर गेल्या आठवड्यात टनामागे ३० ते ४० डॉलर्सने घसरले. सोयाबीन तेलाचा प्रतिटनाचा दर ८८० डॉलर्सपर्यंत आणि पामोलिन तेलाचा दर ८४० डॉलर्सपर्यंत कमी झाला आहे. यामुळे बाजारात खाद्यतेलांच्या किमतींमध्ये घट झाली. मागणी कमी असल्याने घट सातत्याने घसरत आहेत. शेंगदाणा, सूर्यफूल, सरकी तेलाचे दर डब्यामागे २० रुपयांनी, तर अन्य खाद्यतेलांचे दर १० ते १५ रुपयांनी कमी झाले. खोबरेल तेलाच्या दरातही डब्यामागे ५० रुपयांनी घट झाली.
खाद्यतेल, साखर, खोबरे, गुळाच्या दरात घट
By admin | Updated: June 2, 2014 01:13 IST