देहूगाव : आईबरोबर नदीवर गोधड्या व कपडे धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा येथील पाण्याचा प्रवाहात वाहून बुडाल्याने मृत पावल्याची घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास बोडकेवाडी, देहूगाव येथील लहान बंधाऱ्याजवळ घडली. महेश नामदेव भोसले (वय १६, रा. सप्तशृंगी हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) असे मृताचे नाव आहे. राष्ट्रीय आपत्कालीन सुरक्षा पथकाच्या (एनडीआरआफ) पाणबुड्यांनी मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रौत्सव असल्याने उत्सवाच्या अगोदर घरातील कपडे व गोधड्या धुण्यासाठी देहूगावजवळील बोडकेवाडी येथील इंद्रायणी नदीवर गेले होते. तेथे कपडे धुऊन झाल्यानंतर महेश आईला सांगून आंघोळीसाठी पाण्यात गेला. तो परत आलाच नाही. त्याला पोहता येत असल्याने असे अघटित घडेल, असे आईला वाटत नव्हते. मात्र, बराच उशीर झाल्याचे लक्षात येताच आईने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो सापडला नाही. दरम्यान, या घटनेची माहिती देहूरोड पोलिसांना महेशच्या घरी कळविली. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक लालासाहेब गव्हाणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुमारे एक तास स्थानिक लोकांच्या मदतीने महेशला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी लगेचच सुदुंबरे येथील एनडीआरएफच्या जवानांशी संपर्क साधत पाचारण केले. जवानांनी मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळ गावापासून दूर आहे. येथील बंधाऱ्यावरून सध्या पाणी वाहत आहे. बंधाऱ्याच्या बाजूला सर्वत्र खडक आहे. या प्रवाहामध्ये अत्यंत धोकादायक असा पाण्याचा प्रवाह (भोवरा) असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. (वार्ताहर)पोहायला गेलेला तरूण बुडालातळेगाव दाभाडे : मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शिरगावजवळील (ता. मावळ) पवना नदीपात्रात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. सुहास शंकर गिरी (वय १८, रा. काटी, ता. तुळजापूर , जि. उस्मानाबाद , सध्या रा. वाल्हेकरवाडी, रावेत) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास हा आठ दिवसांपूर्वी आपल्या मित्रांकडे राहायला आला होता. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तो चार मित्रांसह पोहण्यासाठी पवना नदीपात्रात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दमछाक होऊन सुहास नदीपात्रात बुडाला. त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास हवालदार एम. व्ही. शेंडगे करीत आहेत.
इंद्रायणीत बुडून युवकाचा मृत्यू
By admin | Updated: October 12, 2015 01:12 IST