पुणे : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या महिनाभराच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागात २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजनेतील ५५ किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करता आले आहे़
सदर योजनेत गेल्या दोन वर्षांपासून ४३२ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकल्या आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरील वर्दळ कमी असल्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम जलद गतीने करता आल्याची माहिती महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली़
शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेत सुमारे ४० टक्के पाण्याची गळती होत असल्याने, ही गळती थांबविणे व शहराच्या सर्व भागात समान पाणी पुरवठा करण्यासाठी सदर योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत शहरात नवीन जलवाहिन्यांचे जाळे तयार करावे लागत असून, शहराच्या मध्यवर्ती भागात विशेषत: बाजारपेठेच्या परिसरात वाहतूकोंडी न होता जलवाहिन्या टाकण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. हे आव्हान सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे महापालिकेला पेलणे सहज शक्य झाले़ लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता या वर्दळीच्या भागांत रस्ते खोदून जलवाहिन्या टाकणे आणि वाहतूक नियोजन करणे त्रासदायक ठरणारे होते. परंतु, लॉकडाऊनच्या काळात वाहनांची व नागरिकांची वर्दळ कमी झाल्याने या रस्त्यांवर जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यावर प्रशासनाने भर दिल्याने, कोणत्याही अडथळ्याविना हे काम गेल्या महिनाभरात पार पडले आहे़
--
शहरासाठी २ हजार ५५० कोटी रुपयांची २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठीचे काम फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू केले आहे. हे काम एल अॅण्ड टी आणि जैन इरिगेशन या कंपन्यांना दिले आहे. योजनेंतर्गत शहरात सर्वत्र नवीन जलवाहिनी टाकून ८० हून अधिक पाण्याच्या टाक्या बांधणार आहेत. तसेच सर्वत्र पाणी मीटरही बसविणार आहेत़