पिंपरी : विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तकाऐवजी चाकू आणि सुरा, शिक्षकांना वाटते शाळेत जायला भीती..., शिक्षक ओरडल्यास जिवे मारण्याची धमकी..., हे वाचले की वाटेल की एखाद्या चित्रपटाची कथा आहे. पण, हे आहे महापालिकेच्या शाळेतील वास्तव चित्र. सभोवतालच्या गुंडाराज वातावरणाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडत आहे. संस्काराअभावी विद्यार्थ्यांची वाढलेली टवाळखोरी रोखण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना आपलेसे करून प्रेम द्यावे, अशी अपेक्षा समुपदेशकांनी व्यक्त केली आहे. तर या मुलांचे समुपदेशन करणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.महापालिकेच्या काही शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये विकृती वाढली आहे. शाळांच्या तक्रारींत मोठी वाढ झाली आहे. शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक हैराण झाले आहेत. शिक्षक बोलल्याचा राग मनात धरून शिक्षकांना गुडांची टोळी आणून मारण्याची धमकी दिली जात आहे. तर, शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असलेल्या शिक्षिकेच्या गाडीचे कव्हर फाडणे, तास सुरू असतानाच वर्गातून पळून जाणे, वर्गात गाणे म्हणणे, गाड्यांची हवा सोडणे असे प्रकार काही शाळांमध्ये सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी पिंपरीगावातील शाळेतही वर्ग सुरू असतानाच विद्यार्थ्यांनी बाइकची स्टंटबाजी करीत वाढदिवस रस्त्यावर साजरा केला. कासारवाडी शाळेतही तोच प्रकार घडला. खराळवाडी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनीही शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या डोक्यात दगड मारला. मुलांनी शाळेतील वस्तू घरी चोरून नेल्या. शाळेतील वस्तूंची तोडफोड केली. निगडी शाळेतही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. पिंपरी, काळभोरनग, निगडी शाळांमध्येही हेच वातावरण आहे. सभोवतालच्या वातावरणाचा विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. त्यांच्या इतर ऊर्जेचा वापर झाला पाहिजे. समुपदेशनाची तत्काळ कार्यवाही होणार आहे. याकरिता मुख्याध्यापकांची बैठक घेतली आहे. सध्या महापालिका शाळा इतर उपक्रम राबविण्यात कमी पडत आहे, असे प्रशासन अधिकारी आशा उबाळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शिक्षक आणि पालकांनी सामाजिक जबाबदारीचे भान म्हणून काम केले पाहिजे. मुलांच्या मानसिकतेत खूप फरक पडला आहे. पूर्वीच्या तुलनेत विद्यार्थ्यांकडे पालकांचे आणि शाळांचे दुर्लक्ष झाले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपलेसे करायला हवे. संस्कार लावण्याच्या अंमलबजावणीत कडक बदल व्हायला हवा. आज घरात वडीलच विद्यार्थ्यांसमोर बसून दारू पिऊ लागले, तर मुलगा काय आदर्श घेणार? - धनंजय आष्टुरकर, मानसोपचारतज्ज्ञ
संस्काराच्या अभावाने वाढली टवाळखोरी
By admin | Updated: December 24, 2015 00:44 IST