पुणे : दसरा सणासाठी मार्केट यार्डातील फुलबाजारात झेंडूसह इतर फुलांनाही मागणी वाढली आहे. प्रामुख्याने झेंडू भाव खाऊ लागला असून, आवकही माफक प्रमाणात होत आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत फुलांचा भाव तेजीत आहे.सर्वदूर झालेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांत झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. उत्पादन वाढल्याने गणेशोत्सवात बाजारात झेंडूची आवकही वाढली. त्यामुळे मार्केट यार्डातील फुलबाजारात झेंडूला मातीमोल भाव मिळाला. मालाची विक्री न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना झेंडू कचऱ्यात फेकून द्यावा लागला. मोठे नुकसान सहन करावे लागल्याने शेतकऱ्यांचे आता दसरा सणाच्या मागणीकडे लक्ष लागून राहिले आहे. दसऱ्यासाठी रविवारपासून झेंडू फुलाला मागणी वाढू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यासह वाई, सातारा, पुरंदर येथून झेंडूची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या फुलांना चांगला भाव मिळत आहे. दसरा मंगळवारी असल्याने सोमवारी मध्यरात्रीपासून फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर होईल. मागणीच्या तुलनेत आवक माफक असल्यास फारशी भाववाढ होणार नाही. शहरात फुलविक्रेत्यांसह बाजारात कोकण, मुंबई, पनवेल येथील विक्रेत्यांकडूनही मागणी वाढू लागल्याचे फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
दसऱ्याला मागणी वाढल्यामुळे झेंडू खातोय भाव
By admin | Updated: October 10, 2016 01:53 IST