वासुंदे : दौंड तालुक्याच्या जिरायत पट्ट्यामध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाल्याने वासुंदे व हिंगणीगाडा या ठिकाणी शासनस्तरावरून शासकीय टँकर सुरू करण्यात आला. मात्र जवळपास महिनाभरापासून हा शासकीय टँकर भरण्यासाठी पुरेसे पाणीच उपलब्ध होत नसल्याने शासकीय टँकर भरण्यासाठी पाणी देता का कोणी पाणी... असे म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तालुक्याच्या जिरायत पट्ट्यातील गावांना साधारण फेब्रुवारी महिन्यापासून नेहमीच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असते. या वर्षी मात्र वासुंदे येथे सप्टेंबरच्या सुमारास सुरू झालेला टँकर ऐन पावसाळ्यातही अविरतपणे सुरू ठेवावा लागला, तर आसपासच्या इतर गावांना डिसेंबर महिन्यातच टँकरसाठी प्रस्ताव दाखल करावे लागले. अशी कधी नव्हे ती पिण्याच्या पाण्याची भयानक परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे. यापूर्वी हे शासकीय टँकर पाण्याने भरण्याची व्यवस्था ही भीमा-पाटस कारखान्यावरील साठवण तलावानजीकच्या विहिरीतून व बोअरवेलमधून करण्यात आली होती. मात्र सद्य:स्थितीत खडकवासला कालव्याला पाणी नसल्याने व कारखान्याचा गाळप हंगाम सुरू असल्याने कारखान्यालाच पाणी कमी पडू लागल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे टँकर भरायचे कुठे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
टँकरला पाणी देता का, पाणी!
By admin | Updated: January 5, 2016 02:31 IST