केडगाव : निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीमुळे दौंड तालुक्यात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यामध्ये केडगाव-पारगाव गट व यवत-भांडगाव गटातील गावे व मतदान बूथ एकमेकांमध्ये मिसळली गेली आहेत.निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या संकेतस्थळावरून सदर मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. गटरचनेनुसार केडगाव-पारगाव गटात केडगाव, दापोडी, खोपोडी, पारगाव, नानगाव, देलवडी, एकेरीवाडी, पिंपळगाव, नाथाचीवाडी, लडकतवाडी या गावांचा सामावेश आहे. तर, यवत-भांडगाव गटामध्ये उंडवडी, यवत, कासुर्डी, भरतगाव, भांडगाव, पडवी, कुसेगाव, देऊळगाव गाडा, खोर, वासुंदे, जिरेगाव या गावांचा सामावेश आहे. परंतु, आयोगाने नुकत्यास प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीमध्ये केडगाव-पारगाव गटामध्ये चुकीने यवत (१३ बूथ), खामगाव (२ बूथ), कासुर्डी (५ बूथ), भरतगाव (२ बूथ), उंडवडी (२ बूथ) या गावांचा सामावेश आहे. तर, यवत-भांडगाव गटामध्ये (गट क्रमांक ५३)मध्ये चुकून केडगाव (८ बूथ), वाखारी (२ बूथ), दापोडी (३ बूथ), गलांडवाडी (१ बूथ), खोपोडी (१ बूथ) या गावांचा सामावेश करण्यात आला आहे. एकूणच आयोगाचा या चुकलेल्या यादीमुळे सावळा गोंधळ उडाला आहे. याशिवाय, तीन महिन्यांपूर्वी नव्याने फॉर्म भरून दिलेल्या मतदारांचे नाव या मतदार यादीत आलेले नाही. फक्त ज्या मतदाराने आॅनलाईन फॉर्म भरला, त्यांची नावे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहेत. दौंडचे तहसीलदार साळुंके म्हणाले, की आयोगाने प्रसिद्ध केलेली मतदार यादी चुकली आहे. परंतु, या चुकांची दुरुस्ती सोमवारी (दि. २३) करण्यात आली असून, सुधारित मतदार यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. (वार्ताहर)
दौैंडला दोन गटांची गावे एकमेकांत मिसळली
By admin | Updated: January 25, 2017 23:57 IST