पुणे : सुटीच्या वेळेत शाळेच्या बाल्कनीच्या कठड्यावर गप्पा मारत बसलेल्या विद्यार्थिनींना शिक्षिकेने बुधवारी छडीने मारून शिक्षा केल्याची माहिती समोर आली. या विद्यार्थिनींनी शिक्षण मंडळांकडे याबाबत लेखी तक्रार केली. त्यामुळे संबंधित शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, येत्या मंगळवारपर्यंत घडलेल्या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रमुख नरुद्दीन सोमजी यांनी गुरुवारी दिले.सिंहगड रस्त्यावरील पालिकेच्या क्रीडानिकेतन शाळेतील इयत्ता सातवीच्या काही विद्यार्थिनी इमारतीवरील पहिल्या मजल्याच्या बाल्कनीवरून पाय खाली सोडून बसल्या होत्या. ही बाब शिक्षकांनी पाहिल्यानंतर त्यातील एका शिक्षिकेने विद्यार्थिनींना छडीने पाठीत मारले. या विद्यार्थिनींनी आपल्याला छडीने शिक्षा केल्याबद्दल तसेच अपशब्द वापरल्याबद्दल शिक्षण मंडळाकडे याबाबत लेखी तक्रार केली. शिक्षण मंडळाकडे प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीवर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार येत्या मंगळवारपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन घटनेची माहिती घेतली. तसेच यापुढील काळात अशा प्रकारच्या चुका करू नयेत, असा शेरा शाळेच्या नोंदवहीत दिला. शिक्षण मंडळाचे सदस्य रघुनाथ गौडा म्हणाले, विद्यार्थिनींना छडीने वळ उठेपर्यंत मारणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे मुलींना अपशब्द वापरण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षिकेची चौकशी करून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
शिक्षिकेला भोवणार छडीची विद्या
By admin | Updated: July 10, 2015 02:19 IST