नारायणगाव : शहरातून प्रवास नको रे बाबा...अशी अवस्था वाहनचालकांची झाली आहे. येथे वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत आहे. वाहतूककोंडी दूर करण्यासाठी शहरातील महामार्गावरील अतिक्रमणे दूर करण्याची मागणी ग्रामस्थ आणि प्रवासी करीत आहेत.पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव शहर हे महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. या गावामधून पुणे किंवा नाशिककडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने प्रवाशांना शहरातूनच जावे लागते. नारायणगाव बसस्थानकासमोर कायम वाहतूककोंडी होत असल्याने वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस व ट्रॅफिक वॉर्डन तसेच स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक हैराण झाले आहेत. रस्त्याच्या लगतचे व्यावसायिक त्यांच्या दुकानातील विक्रीसाठी ठेवलेला माल रस्त्यावर आणून ठेवत असल्याने वाहतूककोंडीला हे व्यावसायिकदेखील जबाबदार आहेत, जीप, टेम्पो, रिक्षा ही वाहने रस्त्यावर असतात, त्यांचेवरदेखील कारवाई पोलिसांनी करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. नारायणगाव पोलीस ठाण्याकडून वाहतूक नियंत्रणाकरिता एकच पोलीस कर्मचारी देण्यात आला आहे. त्याच्या सोबतीला दोन ट्रॅफिक वॉर्डन देण्यात आले आहेत. ते वाहतूककोंडी दूर करण्यासाठी दिवसभर भरउन्हात महामार्गावर उभे असतात. दिवसभर वाहतूककोंडी दूर करून रात्री उशिरा घरी जातात. महामार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरील अतिक्रमणे दूर करावीत, पोलीस खाते व राष्ट्रीय महामार्ग विभागाने ही कार्यवाही लवकर करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि प्रवाशी करीत आहेत.
नारायणगावातून प्रवास नको रे बाबा!
By admin | Updated: June 8, 2015 04:57 IST