पुणे : डोळे दिपवून टाकणारी रंगबिरंगी दिव्यांची विद्युत रोषणाई... फुलांनी सजलेले काल्पनिक रथ आणि हृदयाचा ठोका चुकविणाऱ्या डीजेंच्या दणदणाटात कुमठेकर रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक यंदाही युवकांचे विशेष आकर्षण ठरली. मिरवणूक रथावर असलेल्या स्पिकरच्या भिंती आणि त्यावर सुरू असलेल्या जुन्या हिंदी-मराठी गीतांच्या गाण्यांवर ताल धरलेली तरुणाईच्या गर्दीचा हा रस्ता रात्रीपर्यंत गर्दीने फुलून गेला होता. मात्र, रात्री स्पिकर बंद झाल्यानंतर या रस्त्यावरील मिरवणुका जागेवर थांबल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी (सोमवारी) सहाचा ठोका पडताच या मिरवणूक मार्गावर पुन्हा डीजेचा दणदणाट झाला. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास शनिपार तरुण मंडळाच्या मिरवणुकीनंतर या मार्गावरील मिरवणुकीची दुपारी बारा वाजता सांगता झाली. तब्बल २६ तास या मार्गावर ही विसर्जन मिरवणूक सुरू होती. त्यात ४४ मंडळांनी सहभाग घेतला. सकाळी साडेदहाच्या सुमारास या मार्गावर मोरेश्वर मित्रमंडळाच्या मिरणुकीस सुरुवात झाली. मंडळाने मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांवर गजानन मित्रमंडळ होते. दिवसभरात अगदी तुरळक म्हणजेच सुमारे नऊ-दहा मंडळे कुमठेकर रस्त्यावरून मार्गस्थ झाली. त्यातही मानाचे गणपती टिळक चौकातून जाणार असल्याने या मंडळांना चौकात येताच त्यांना पोलिसांकडून शास्त्री रस्त्याने पुढे जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, जसजशा मानाच्या गणपतींच्या मिरवणुका पुढे सरकत होत्या तसतशा सायंकाळच्या सुमारास या रस्त्यावरील मंडळांनी केलेले आकर्षक विद्युत रोषणाईची मंडळे टिळक चौकात येऊन थांबली होती. टिळक चौकात रात्री आठच्या सुमारास नवनाथ अचानक तरुण मंडळास प्रवेश देण्यात आला. डीजेच्या भिंतींसह आलेल्या या मंडळाच्या समोर तरुण-तरुणींची तुफान गर्दी होती. त्यानंतर त्या पाठोपाठ पोलिसांकडून कुमठेकर रस्त्यावर आलेल्या गोखलेनगर रहिवासी संघाच्या बाप्पाला टिळक चौकात येण्यास परवानगी देण्यात आली. मयूर रथात विराजमान असलेल्या या बाप्पांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पुढे या मार्गावरून रात्री बारापर्यंत अवघ्या चार मंडळांना टिळक चौकात येऊ देण्यात आले. तर तीन ते चार मंडळांना पोलिसांनी टिळक रस्त्याने विसर्जनास जाण्याच्या सूचना केल्या त्यामुळे काही काळ टिळक चौकात गोंधळ निर्माण झाला होता. ---------१२ नंतरही दणदणाट सुरूच रात्री १२ नंतर पोलिसांकडून स्पिकरवर बंदी घालण्यात आली होती. त्यानुसार, बारा वाजताच, महापालिकेचा स्वागत कक्ष आणि पोलिसांच्या कक्षातील ध्वनिक्षेपण यंत्रण तत्काळ बंद करण्यात आली. मात्र, या रस्त्यावरील डीजेंचा दणदणाट त्यानंतरही तब्बल अर्धातास सुरूच होता. काही मंडळांनी तर डीजे बंद करू नये म्हणून त्यावर गणपतीची आरती तसेच देवाची भक्तिगीतेही लावली होती. तर जो पर्यंत पोलीस प्रत्यक्ष जाऊन डीजे बंद करण्याच्या सूचना देत नव्हते, तोपर्यंत अनेक मंडळांचा आवाजाचा दणदणाट सुरूच होता.मद्यपींचा धिंगाणा आणि गायब पोलीस डीजेच्या दणदणाटामुळे या मार्गावरील मिरवणूक गेल्या काही वर्षांपासून तरुणाईचे खास आकर्षण ठरते. मात्र, गेल्या काही वर्षांत या मार्गावरील मिरवणुकीची संख्याही वाढली असून, हा रस्ता मद्यपींचे धिंगाणा केंद्र बनले आहे. रात्री १२ वाजता मिरवणुका संपताच या मार्गावर ठिकठिकाणी दारूच्या पार्ट्याच रंगल्या होत्या. मद्यधुंद अवस्थेतील तरुण या रस्त्यावर जागा मिळेल तिथे पडले होते. तर अनेकांकडून रस्त्यावरच ओरडत जोरजोरात धिंगाणा घातला जात होता. या रस्त्यावर सर्वत्र, खाद्यपदार्थांचे ढीग पडलेले होते. मात्र, हे सर्व सुरू असताना, या मार्गावर कोठेही पोलिसांचा मागमूसही नव्हता. त्यामुळे या रस्त्यावर मद्यापींचा अक्षरश: धिंगाणा सुरू होता. त्याचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागत होता. तर लक्ष्मी रस्त्यावर जाण्यासाठी नागरिकांना याच रस्त्याचा वापर करावा लागल्याने या कुटुंबासह जाणाऱ्या या नागरिकांनाही या मद्यपींचा त्रास सहन करावा लागला.-------साधेपणाचा आदर्शही डीजेचा दणदणाट ही कुमठेकर रस्त्याची ओळख असली तरी या मार्गावरून जाणाऱ्या पवना मित्र मंडळाने अनोखा आदर्श घालून दिला. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या मंडळाने कोणताही स्पिकर न लावता मिरवणूक काढली, तसेच कोणतेही डेकोरेशन न करता अगदी साधेपणाने पर्यावरणपूरक गणपती सादर करून एक अनोखा आदर्श घालून दिला. बाल संभाजी मंडळाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी पाण्याचा अपव्यय टाळण्याचा मोठा फलक लावला होता. स्मार्ट सिटीसाठी सहभाग घेण्याचे आवाहनही या मंडळाकडून करण्यातय येत होते. त्यामुळे या मार्गावर सामाजिक भानही जपलेली मंडळेही दिसून आली. श्री सुंदर गणपती तरुण मंडळ ट्रस्टचा मत्स्यगंधा रथ आकर्षणाचा केंद्रबिंदू होता.-------१२ नंतर मंडळांचा ठिय्या रात्री १२ वाजल्यानंतर पोलिसांनी डीजे बंद करताच, कुमठेकर रस्त्यावरील मंडळांनी मिरवणूक जागेवरच थांबविली. रात्री साडे- अकराच्या सुमारास विसावा मारूती मंडळ टिळक चौकात आले. त्यानंतर अर्धा तासाताच डीजे बंद होताच हे मंडळ जागेवरच थांबले. त्यानंतर पोलिसांनी मंडळास विनंती केल्यानंतर मंडळाने आपला देखावा पुढे घेतला. मात्र, या मंडळासाठी वाट करून देताना, पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांना काही काळ सौम्य लाठीमारही करावा लागला. मात्र, विसावा मारूती नंतर पोलिसांनी गुरूदत्त तरूण मंडळ आणि नवजीवन मित्र मंडळालाही पुढे जाण्यास सांगितले. गुरूदत्त तरूण मंडळाने बासरी वाजविण्यात मग्न असलेल्या राधा-कृष्णाचा आकर्षक देखावा साकारला होता. तर नवजीवन मित्र मंडळाने विद्युत रोषणाई केली होती.
डीजेचा दणदणाट आणि सामाजिकतेचे भान
By admin | Updated: September 29, 2015 02:29 IST