हणमंत पाटील, पुणे :
गेल्या काही वर्षांत शहरातील पूररेषेबरोबरच नैसर्गिक ओढे व नाल्यामध्ये अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामाचे प्रमाण वाढले आहे. साधारणत: हडपसर, मुंढवा, खराडी, वडगावशेरी या पूर्व भागातील उपनगरांत सर्वाधिक २८ नैसर्गिक नाले वळविण्यात आल्याची कबुली महापालिका प्रशासनाने माहिती अधिकारातून दिली आहे. मात्र, माहिती असूनही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाईकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. पुणे शहराचा भौगोलिक आकार बशीसारखा आहे. चारही बाजूने डोंगर-टेकड्या आणि मध्यवर्ती पेठांचा भाग खोलगट आहे. त्यामुळे चारही दिशेने येणारे नैसर्गिक ओढे, नाले एकत्रित येऊन मुळा-मुठा नदीला मिळतात. परंतु, शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे नदी व नाल्यामध्ये अतिक्रमणे वाढली. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे महापालिका प्रशासन कारवाई करीत नाही. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील ओढे काटकोनात वळवून काही बांधकाम व्यावसायिकांनी गृहप्रकल्प उभारले आहेत. प्रशासनाच्या आशीर्वादाने प्रकल्प कायदेशीर करून घेण्यात आल्याचे ‘प्रायमोव्ह’ संस्थेच्या अहवालातून पुढे आले आहे. दरम्यान, मध्यवर्ती शहरातील वाढत्या लोकसंख्येचा लोंढा उपनगरांकडे वळला. साधारणत: पूर्व भागातील हडपसर, मुंढवा, वडगावशेरी व खराडी परिसराचा औद्योगिक व आयटी कंपन्यांमुळे झपाट्याने विकास झाला; मात्र याच भागातील नैसर्गिक-ओढे नाल्यामध्ये सर्वाधिक अतिक्रमण झालेले दिसून येते. ओढ्यातील ग्रीन पट्ट्यात बांधकाम करताना संबंधित नाले सोयीनुसार काटकोनात वळविण्यात आले आहेत. पूर्व भागातील उपनगरांसह पर्वती, धानोरी, बावधन, कोथरूड, वारजे असे मिळून २८ नैसर्गिक नाले वळविण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात महापालिकेकडून ओढ्यात अतिक्रमणे केलेल्या बांधकामांना कारवाईची नोटीस पाठविण्याचे सोपस्कर पार पाडले जातात. परंतु, मागील दोन वर्षांपासून ओढे व नाल्यातील अतिक्रमणे काढण्याकडे बांधकाम व अतिक्रमण विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्याचा नाहक त्रास प्रत्येक वर्षी पावसाळ्यात सोसायट्यांमध्ये पाणी घुसून नागरिकांना सहन करावा लागतो.