पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यासोबतच कोरोना लसीकरण मोहीमेवर अधिक भर देण्यात येणार आहे. यासाठीच येत्या एक एप्रिलपासून शहर आणि जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या दुप्पट म्हणजे ३१६ वरून थेट ६०० केंद्रांपर्यंत वाढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी लागणारी अतिरिक्त लस केंद्र सरकारने पुरवावी यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बैठकीतूनच संपर्क साधण्यात आला.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना निर्मूलन आणि उपाययोजना संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवण्याची गरज वैद्यकीय तज्ञ आणि लोकप्रतिनिधींनी केली. जिल्ह्यातील आतापर्यंत सव्वा पाच लाख नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे, त्या ठिकाणी लस दिली पाहिजे, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
जिल्ह्यात नव्याने आणखीन ३०० कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या केंद्रासाठी केंद्र सरकारने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बैठकीत झाली. तेव्हा लसीकरण या संदर्भात केंद्राचे प्रभारी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बैठकीतच संपर्क साधण्यात आला. जावडेकर यांनी पुणे जिल्ह्याला लस पुरवण्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेत यासंदर्भात संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले.
पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये सध्या सुरु असलेल्या ३१६ लसीकरण केंद्रावर गेल्या दोन दिवसांत प्रतिदिन सरासरी ३० हजारपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात गुरुवार (दि. २५) रोजी उच्चांकी ३८ हजार जणांना लस देण्यात आली. लसीचा साठा अपुरा पडत असून तो वाढवण्याची मागणी केली. तसेच ज्यादा लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी त्यांना लसपुरवठा करण्याची मागणी बैठकीत झाली.
----
मी लस घेतली; पण फोटो नाही काढला - अजित पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना लस घेतली आहे. मात्र आपण फोटो काढलेला नाही.
पत्रकारांनी, तुम्ही लस घेतली का, असा प्रश्न अजित पवारांना विचारल्यानंतर ते म्हणाले, होय रे, बाबा मी लस घेतली आहे. मला इतरांसारखा लस घेताना फोटो काढायचा नव्हता आणि अशी नौटंकी मला आवडत नाही.
------