पुणे : सध्याच्या राजकीय स्थितीने व्यथित होत, ज्येष्ठ कामगार नेते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार आघाडीचे पदाधिकारी अॅड. म. वि. अकोलकर यांनी आपल्या पदाचा व पक्षाचाही राजीनामा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिला. निवडणुकीच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांचेही कामगार, कष्टकरी वर्गाकडे दुर्लक्ष झाल्याने व्यथित होत राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अकोलकर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कामगार आघाडीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. शहरात महापालिका निवडणुकीचे व देशात दोन महत्त्वाच्या राज्यांमधील निवडणुकीचे वातावरण आहे. यात कुठेही कामगार, कष्टकरी वर्गाचे हित जपले जात आहे, असे दिसत नाही. स्वार्थाचेच राजकारण सर्वत्र दिसते आहे. पक्षांतराची तर लाटच आली आहे. त्यात जनहिताच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. या स्थितीत कामगार हित महत्त्वाचे वाटत असल्याने आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचे पत्र अकोलकर यांनी पक्षाध्यक्ष पवार यांना लिहिले आहे.
राजकीय स्थितीने व्यथित पदाधिकाऱ्याचा राजीनामा
By admin | Updated: February 9, 2017 00:18 IST