लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : माउंट एव्हरेस्ट सर केल्याचा दिनेश राठोड आणि तारकेश्वरी राठोड यांचा दावा खोटा असल्याचा पुनरुच्चार पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी पुन्हा केला. २० एप्रिल २०१६ पासून त्यांना मोकळीक दिल्यानंतर त्यांनी हजर होऊन गिर्यारोहण मोहिमेबाबत अहवाल देणे आवश्यक असताना ते कामावर विनापरवाना गैरहह्जर असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती शुक्ला यांनी दिली.दिनेश राठोड आणि तारकेश्वरी राठोड या दाम्पत्याने आज पत्रकार परिषद घेऊन पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून मानसिक छळ केल्याचा दावा करून काही आरोप केले. त्याबाबत विचारणा केली असता शुक्ला म्हणाल्या, ‘‘नेपाळ येथे झालेल्या भूकंपामुळे रद्द केलेल्या २०१५ च्या गिर्यारोहण मोहिमेच्या वेळीही राठोड यांना पोलीस कल्याण निधीतून २ लाख रु पये आर्थिक मदत देण्यात आली होती. त्या वेळी ते कामावर हजर झाले नाहीत. पैसेही परत केले नाहीत. २०१६ मध्ये त्यांना माउंट एव्हरेस्ट गिर्यारोहण विश्वविक्रम अभियानासाठी जाण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. मोहीम संपल्यानंतर त्यांनी कामावर हजर राहून अहवाल देणे आवश्यक होते. मात्र, ते आजपर्यंत विनापरवाना गैरहजर आहेत; त्यामुळे त्यांना निलंबित केले आहे. त्यांची विभागीय चौकशी केली असता ते गैरहजर राहिले.’’
राठोड दाम्पत्यावर शिस्तभंग कारवाई
By admin | Updated: May 27, 2017 01:28 IST