घोडेगाव : माळीण दुर्घटना, त्यातील मदतकार्य, शासनाचे काम व पुनर्वसन यांचा अभ्यास करण्यासाठी व भविष्यात अधिकारी म्हणून काम करताना अशा घटना घडल्यानंतर काय केले पाहिजे, याचे प्रशिक्षण घेण्यासाठी यशदामार्फत सन २०१५ मध्ये निवड झालेले ४२ उपजिल्हाधिकारी व ३३ तहसीलदार यांनी माळीणला भेट दिली. यामध्ये प्रांताधिकारी कल्याणराव पांढरे यांनी चित्रफितीद्वारे घडलेली घटना व त्यानंतर प्रशासनाने केले काम यांची माहिती दिली. या प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यासमवेत यशदाचे सहयोगी प्राध्यापक डी. डी. देशमुख, जनसंपर्क अधिकारी प्रताप भोसले होते़ या सर्वांना डिंभे येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळ या सेवाभावी संस्थेच्या सभागृहात प्रांताधिकारी कल्याणराव पांढरे यांनी माळीण दुर्घटनेबाबत माहिती दिली़ यामध्ये दुर्घटना का घडली, मदतकार्य कसे करण्यात आले, एनडीआरएफ व इतर खासगी संस्थांनी कशी मदत केली, जिल्हधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, प्रांताधिकारी डी़ बी़ कवितके, तहसीलदार बी. जी़ गोरे, गटविकास अधिकारी विवेक इलमे यांनी कशा प्रकारे कामगिरी बजावली, याबाबत माहिती दिली़ प्रशासनाने केलेल्या कामाबाबत कोणीही नाराजी व्यक्त केली नाही अथवा आतापर्यंत झालेल्या मदतकार्यात कोणताही तक्रार आलेली नाही. याची सविस्तर माहिती देत प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर काय केले पाहिजे व अशा घटना घडल्यास अशा प्रकारे त्याला सामोरे गेले पाहिजे, याचे सविस्तर प्रशिक्षण व माहिती कल्याणराव पांढरे यांनी दिली. तसेच महाराष्ट्र आरोग्य मंडळ या संस्थेचे प्रकल्प समन्वयक सुरेश काळे, उदयसिंह चौधरी यांनी आदिवासी भागात संस्थेच्या सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली.(वार्ताहर)
आपत्ती आणि बचावकार्याचा अधिकाऱ्यांनी घेतला अनुभव
By admin | Updated: August 19, 2015 00:08 IST