कदमवाकवस्ती : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे कदमवाकवस्ती येथील हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्र. ६ व मगरपट्टा येथील हवेली क्र.३ या दोन्ही कार्यालयातील सबरजिस्ट्रार गेल्या आठ दिवसांपासून गैरहजर आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीचे काम बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर शासनाचा लाखोंचा महसूल अडकला आहे.
हडपसर मगरपट्टा येथील हवेली दुय्यम निबंधक क्र.३ व ६ या दोन्ही कार्यालयात एका दिवसात १०० ते १२० दस्त नोंदणी होत असतात. परंतु गेल्या सात दिवसांपासून सबरजिस्ट्रार नसल्याने ७०० ते ८०० दस्त नोंदणी होऊ न शकल्याने शासनाचा लाखों रुपयांचा निधी अडकला आहे.
या दोन्ही कार्यालयात दस्तनोंदणी करण्यासाठी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती,उरुळी कांचन, थेऊर, मांजरी, मुंढवा, शेवाळेवाडी, फुरसुंगी, वडकीगाव, उरुळी देवाचीसह बारा वाड्यांसह हडपसर उपनगरातून नागरिक व वकील दस्तनोंदणीसाठी येतात. सहायक निबंधक रजिस्ट्रार गैरहजर असल्याने दस्तनोंदणीचे काम गेल्या सात दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. तसेच नागरिकांनादेखील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.
पूर्व हवेलीत सध्या गुंठेवारीची मागणी जास्त असल्याने दस्त नोंदणी साठी नागरिक व व्यावसायिक यांची पळापळ सुरू आहे. या संदर्भात जिल्हा निबंधक अनिल पारखे यांस संपर्क केल्यावर त्यांनी या जागांसाठी सध्या अधिकारी उपलब्ध होत नाहीये असे सांगितले.
चौकट
दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी- विक्री, मुद्रांक शुल्क भरणाचे व्यवहार करण्यात येतात. सर्व्हर डाउनच्या घटनांमुळे दस्त नोंदणीस अडचणी येत होत्या. त्यावर उपाय म्हणून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने क्लाउड प्रणाली सुरू केली. त्यामुळे काही दिवस दस्त नोंदणीची प्रकिया सुरळीत होती. परंतु, बुधवारी वाघोली येथील हवेली २७ नंबर कार्यालयात केबल तुटल्यामुळे दस्त नोंदणी प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठप्प होती. त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले.