पुणे : महापालिकेच्या वतीने गेल्या साडेचार वर्षांत विविध विभागांमार्फत कोणती विकासकामे पार पाडण्यात आली, त्यातील किती कामे पूर्ण झाली, किती पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, येत्या काळात नव्याने काही कामे सुरू आदींचा आढावा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आला. महापालिकेतील विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेण्यात आली. मागील महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक आश्वासने दिली होती. त्यातील किती आश्वासने पूर्ण करण्यात पक्षाला यश आले आहे. गेल्या साडेचार वर्षांत किती कामे मार्गी लावता आली याचा आढावा राष्ट्रवादीच्या वतीने घेण्यात आला. या वेळी शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, आमदार अनिल भोसले, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने उडडणपूल, घनकचरा, बांधकाम, पाणीपुरवठा आदी विभागांकडून गेल्या साडेचार वर्षांत झालेल्या कामांची माहिती विभागप्रमुखांकडून घेण्यात आली. त्याचबरोबर येत्या दोन ते तीन महिन्यांत कोणती विकासकामे पूर्ण होणार आहेत, काही नवीन कामांची सुरूवात होणार आहे का आदी माहिती या वेळी जाणून घेण्यात आली. (प्रतिनिधी)
विकासकामांचा घेतला लेखाजोखा
By admin | Updated: October 7, 2016 03:25 IST