किवळे : विकासनगर येथील लोटस वृंदावन या गृहसंकुलातील पाचव्या मजल्यावरील एका सदनिकेत शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, सदनिकेतील कपडे, कागदपत्रे व फर्निचर जाळल्याने मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिक, तरुण, तसेच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच प्रयत्न केल्याने एका तासात आग आटोक्यात आली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबाराच्या सुमारास विकासनगर येथील लोटस वृंदावन या गृहसंकुलातील बी ५०२ या सदनिकेतून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे येथील दादा भोसले या ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आले. त्यांनी येथील तरुण कार्यकर्ते प्रशांत तावरे, राजेंद्र तरस, धीरज बाबर, रोहित माळी व गृहसंकुलातील सुरक्षारक्षक यांना बोलावून घटनास्थळी धाव घेतली. मात्र सदनिकेच्या दरवाजाला कुलूप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दरवाजा तोडण्यास सुरुवात केली. खिडक्यांच्या सर्व काचा फोडल्या. आवाजाने मकरंद मित्र मंडळ व युवा फाउंडेशनचे सभासद जमा झाले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. दरवाजा तोडून आत प्रवेश करून सदनिकेच्या स्वयंपाकघरातील सिलिंडर सर्वप्रथम बाहेर काढला. बइमारतीच्या आग प्रतिबंधक यंत्रणेतून पुरेसे पाणी येत नसल्याने गणेश गावडे व कृष्णा यांनी इमारतीच्या वरील टाकीतून पाण्याची व्यवस्था केली. महापालिकेचे अग्निशामक दलाचे सहा जवान बंबासह दाखल झाले. सदनिकेतील वस्तू, कपाटातील व पोटमाळ्यावरील सर्व कपडे, कागदपत्रे व फर्निचर जळून मोठे नुकसान झाल्याचे दिसत होते. सर्व खोल्यांतील भिंती काळ्या पडल्या होत्या. विद्युत वाहिन्या जळून गेल्या होत्या. सर्व स्थानिक तरुण काजळी अंगावर आल्याने काळवंडले होते. सदनिकेत राहणारे पराग प्रधान व त्यांची पत्नी नोकरीनिमित्त बाहेर होते. इस्त्री सुरू राहिल्याने चादरीने पेट घेतल्याने आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
विकासनगरात सदनिकेला आग
By admin | Updated: January 17, 2015 00:14 IST