पुणे : स्मार्ट सिटीबाबत नागरिकांच्या सूचना मागवून त्यांनाही त्यामध्ये सहभागी करून घेऊन पुणे महापालिकेने राबविलेल्या ‘माझं स्वप्न, स्मार्ट पुणं’ यासारखी स्पर्धा इतर शहरांनीही राबवून नागरिकांना स्मार्ट सिटीच्या प्रकल्पामध्ये सहभागी करून घेण्याच्या सूचना मुंबईत बुधवारी झालेल्या महापालिका आयुक्तांच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.केंद्र शासनाच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी स्पर्धेसाठी राज्यातून नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली, पुणे-पिंपरी, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक या शहरांची निवड करण्यात आली आहे. या महापालिकांना आता केंद्राकडे आपले प्रस्ताव सादर करावे लागतील. त्यानुसार त्यांचे मूल्यांकन होऊन पहिल्या टप्प्यातील २० शहरांची निवड केली जाईल. या पार्श्वभूमीवर, केंद्राकडे कसा प्रस्ताव सादर करावा, याबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी या महापालिका आयुक्तांची मुंबईत बैठक झाली. याबाबत कुणाल कुमार यांनी सांगितले, ‘‘केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करताना कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव करण्यात यावा, कशावर भर दिला जावा, यावर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. महापालिका आयुक्तांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना त्याबाबत सूचना करण्यात आल्या. पुणे महापालिकेने यातील बहुतांश सूचनांचे पालन केलेले आहे.’’पुणे महापालिकेले मिळालेले गुण पाहता, केंद्रीय पातळीवर स्पर्धेमध्ये पहिल्या टप्प्यातील २० शहरांमध्ये पुण्याचा समावेश निश्चित मानला जात आहे. मात्र, पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांचा एकत्रित समावेश केल्याने विनाकारण गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले आहे. (प्रतिनिधी)
स्मार्ट सिटी स्पर्धा इतर शहरांतही राबवा
By admin | Updated: August 20, 2015 02:24 IST