परिंचे : बहिरवाडी (ता. पुरंदर) या बाजूने पुरंदर किल्ल्याला भीषण वणवा लागला असून सुमारे तीन किलोमीटरपर्यंतचे किल्ल्यावरील जंगलाचे क्षेत्र या वणव्यात जळाले असल्याचे माहिती बहिरवाडी गावचे सरपंच दशरथ जानकर यांनी दिली. वणवा पेटवणाऱ्यांचा शोध लावून दोषींवर वन विभागाने गुन्हे दाखल करण्याची मागणी जानकर यांनी केली आहे.
रविवारी दुपारी ही आग कोंडकेवाडीच्या बाजूने लागली. पुरंदर किल्ल्यावर असलेल्या लष्करी तळापर्यंत हा वणवा पेटत गेला आहे. कोंडकेवाडी ते बहिरवाडी परिसरात हा वणवा पसरला असून दर वर्षी वणवा लागण्याच्या घटना या परिसरात घडत असल्याने झाडांचे व वन्यप्राण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे जानकर यांनी सांगितले. काही ठिकाणी शेतकरी शेताच्या कडेला काटेरी झुडपे किंवा कचरा पेटवण्यासाठी आग लावतात. पण वाऱ्यामुळे छोट्याशा आगीचे वणव्यात रुपांतर होते.
पुरंदर किल्ल्याच्या परिसरात उंच गवत असल्याने जाळ रेषा काढणे शक्य नाही. तसेच डोंगरावर तीव्र उतार असल्याने जाळरेषा काढणाऱ्यास मशीन घेऊन जाणे शक्य नसल्याचे वनरक्षक महादेव सस्ते यांनी सांगितले. किल्ल्याच्या पायथ्याशी येणारे पर्यटक किंवा मद्यपीच्या हलगर्जीपणामुळेसुध्दा वणवे लागण्याच्या घटना घडल्या आहेत. पुरंदर किल्ल्याच्या परिसरातील डोंगर गवताळ असून वणवा लागल्यास या परिसरात मोठी नैसर्गिक हानी होत आहे. या डोंगररांगामध्ये वन विभागाच्या वतीने जाळरेषा काढल्या असत्या तर मोठी हानी टळली असती. काळदरी,बांदलवाडी, बहिरवाडीच्या परिसरात वणव्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण होणे महत्त्वाचे असून वणवा विझवण्यासाठी लोकसभा वाढणे गरजेचे असल्याचे काळदरीचे सरपंच गणेश जगताप यांनी सांगितले आहे.
फोटो ओळ- पुरंदर किल्ल्याला भीषण आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हानी झाली आहे.