लेण्याद्री : आदिवासी भागातील करंजाळे गावातील समाजमंदिर पाडल्याप्रकरणी ग्रामस्थांचे दि. २१ पासून सुरू असलेले उपोषण आज दि. २२ दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेनंतर, तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर समाप्त करण्यात आले.पंचायत समिती प्रशासन जाणीवपूर्वक समाजमंदिर पाडणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत मनसेचे विभाग अध्यक्ष नंदकिशोर जगताप यांनी कार्यकर्त्यांसह पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. करंजाळे गावात ९७-९८ मध्ये समाजमंदिर बांधण्यात आले होते. माजी सरपंच चंद्रकांत जगताप यांनी मार्च २0१४ मध्ये समाज मंदिराचा काही भाग पाडल्याची ग्रामस्थांची तक्रार होती. सुभाष जगताप, दिनकर जगताप, विक्रम चव्हाण, चेतन जगताप, ताराचंद जगताप, शंकर जगताप, उत्तम राक्षे, भरत पवार, सुदाम जगताप, गोविंद जगताप, सीताराम मांगले आदी ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले होते.उपोषणासंदर्भात मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, तालुकाध्यक्ष साईनाथ ढमढेरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्याशी उपोषणस्थळी याप्रश्नी मार्ग काढण्यासाठी चर्चा केली. त्यानंतर समाजमंदिर बांधण्यासाठी शासकीय निधी उपलब्ध करून, चंद्रकांत जगताप यांच्या वतीने नवीन बांधकाम तीन महिन्यांत करून देण्याचे लेखी आश्वासन करंजाळेचे सरपंच व ग्रामसेवकांनी उपोषणकर्त्यांना दिले. यानंतर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, पंचायत समिती सदस्य पंडित मेमाणे, महेंद्र सदाकाळ, करंजाळेचे सरपंच यशवंत लांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. (वार्ताहर) ४समाज मंदिराचा प्रश्न आतापर्यंत फक्त दै. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठविला होता. ‘लोकमत’मुळेच हा प्रश्न मार्गी लागल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. ४सदर समाजमंदिर बांधण्याच्या वेळेस जागामालकांकडून कोणत्याही प्रकारचे बक्षीसपत्र करून घेण्यात आले नव्हते. तत्कालीन ग्रामसेवकाने बेजबाबदारपणे केलेल्या कामामुळे हा प्रश्न निर्माण झाला. आता मात्र संबंधित जागामालकाकडून विनामोबदला बक्षीसपत्र करून घेण्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीने दिले आहे.
करंजाळे ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता
By admin | Updated: January 22, 2015 23:32 IST