हडपसर : पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दरमजल करीत निघालेल्या संत ज्ञानेश्वरमहाराज व संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे स्वागत हडपसरवासीयांनी मोठ्या उत्साहात केले. दुतर्फा गर्दी करून पालखीचे दर्शन घेत वारकऱ्यांना फराळ अन्नदान केले. त्यानंतर माऊलीची पालखी सासवड व तुकाराममहाराजांची पालखी लोणी मुक्कामी प्रस्थान झाली.सकाळी ८ वाजता वैदुवाडी मगरपट्टा येथे दूरहून दिसणारा माऊलीच्या रथाचा कळस पाहताच भाविक नतमस्तक झाले. मावडेकर बंधूचा नगारा, कर्णेकरी वाघमारे, पालखी सोहळ््याचे मालक बाळासाहेब आरफळकर, माऊलीचा अश्व व स्वाराचा अश्व पालखी रथापुढे धावत होते. अबदागीरी, चामर छत्र, सेवेकरी पालखी रथापुढे होते.भवानी पेठेतून प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला विसावा हडपसर गाडीतळ येथे ९ वाजून १० मिनिटांनी घेतला. तासभर पालखी येथे होती. महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते पादुकांची पूजा झाल्यानंतर भाविकांनी दर्शन घेतले. या वेळी माजी महापौर वैशाली बनकर, चंचला कोद्रे, विजय देशमुख, विजया कापरे, रंजना पवार, विजया वाडकर, सुरेश जगताप, संजय गावडे उपस्थित होते.शहरातून जिल्हाहद्दीत प्रवेश केल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, फुरसुंगी ग्रामस्थांच्यावतीने भेकराईनगर येथे पालखीचे स्वागत करण्यात आले. तासाभराच्या विश्रांतीनंतर पालखी वडकीच्या दिशेने मार्गस्थ झाली. पावणेतीनच्या दरम्यान दिवेघाटाकडे पालखीने मार्गक्रमण केले. या वेळी घाटपरिसर हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमुन गेला होता. एकादशीनिमित्त फराळ तसेच चहाची व्यवस्था तरुणांनी केली.तुकोबारायांची पालखी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी हडपसर येथील विसावास्थानी आगमन झाले. हरपळे बिल्डींग येथील विसावास्थानी भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पालखीचे येथील नगरसेवक व महापौरांनी स्वागत केले. दुपारी २ वाजता येथून प्रस्थान होवून मांजरी फार्म येथील विसाव्यानंतर लोणी मुक्कामी पालखी पोहचली.हडपसर-गाडीतळ येथे संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराममहाराजांच्या पादुकांचे लाखो वैष्णवभक्तांनी शांततेत भक्तीभावाने दर्शन घेतले. हडपसरनगरी वैष्णवभक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती. पहाटे चार वाजल्यापासून वारकरी हडपसरहून मार्गस्थ होऊ लागला. खांद्यावर पताका, डोक्यावर तुळस, गळ्यात विणा, मृदंग असे रूप धारण केलेला वारकरी आषाढी वारी करीत आहे. (वार्ताहर)
हरिनामाच्या गजरात पंढरीच्या ओढीने पालखीचे प्रस्थान
By admin | Updated: July 13, 2015 03:43 IST