पुणे : राज्यात रिक्षाला लहान माल वाहतूकीची परवानगी द्यावी ही मागणी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचली आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या मागणीचे निवेदन ठाकरे यांना पाठवले. रिक्षा पंचायतीने या आधीच सरकारकडे तशी मागणी केली असून त्यामुळे केवळ प्रवासी वाहतूकीवर अवलंबून रिक्षा चालकांना दिलासा मिळेल असे मत व्यक्त केले आहे.
कोरोना साथीमुळे ग्राहकांची मानसिकता बदलली असून यामुळे रिक्षाला पूर्वीसारखा व्यवसाय राहिलेला नाही. त्यामुळे एखादी लहान कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून राज्यात रिक्षामधून लहान मालाची वाहतूक सुरू करता येणे शक्य आहे असे आमदार शिरोळे यांनी ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
रिक्षाचालक मालकांसाठी काम करणाऱ्या रिक्षा पंचायतीनेही राज्य सरकारकडे हीच भूमिका मांडली आहे. रिक्षांना वाहतुकीची परवानगी मिळाल्यास जुन्या रिक्षांना त्याचा फायदा होईल. तसेच दगदग सहन न होणाऱ्या वृद्ध रिक्षा चालकांना चांगला व्यवसाय मिळेल असे पंचायतीने म्हटले आहे.