पुणे : महापालिका निवडणुकीतील कामांसाठी संगणकावर विसंबून राहणाºया पालिका निवडणूक शाखेला संगणक प्रणालीनेच मतदारयादीसंदर्भात चांगलाच झटका दिला आहे. २१ जानेवारीला जाहीर करण्याची मतदारयादी प्रशासनाला अद्याप जाहीर करता आलेली नाही.
पालिकेची मतदारयादी व जिल्हा निवडणूक आयोगाकडून अंतिम मान्यता होऊन आलेली यादी यात थोडा फरक आढळत असल्याचे निदर्शनास आले आहे. तो फरक दूर करून सोमवारी रात्री अंतिम मतदारयादी पालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येईल, असे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.निवडणूक शाखेच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे २१ जानेवारीलाच अंतिम मतदारयादी जाहीर होणार होती; मात्र ती सोमवारी दुपारपर्यंत (दि.२३) जाहीर झालेली नव्हती. याबाबत आयुक्तांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदारयादीच पालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यावर आलेल्या हरकती आणि सूचनांनुसार बदल करून ही यादी आॅनलाइनच जिल्हा निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली. त्यांच्याकडून याद्या मिळाल्या त्या वेळेस काही दुरुस्त्या बाकी असल्याचे लक्षात आले.’’ (प्रतिनिधी)