उरुळी कांचन : दिवसेंदिवस उरुळी कांचन शहराची वाढ झपाट्याने होत आहे. मात्र शहरातील लोकवस्तीला पाणीपुरवठय़ासाठी कोणतीही कायमस्वरूपी योजना नाही. कॅनॉल आटल्यामुळे सध्या उरुळी कांचनमध्ये नागरिकांसाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती ग्रामसेवक एस. बी. खरपुडे व सरपंच दत्तात्रय कांचन यांनी दिली.उरुळी कांचन शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ५४ कोटींची पाणी योजना पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांच्याकडे विचाराधीन आहे. या योजना मंजूर होण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत सतत पाठपुरावा सुरू आहे. काही दिवसांत ही योजना मंजूर होणार असल्याची माहिती सरपंच कांचन यांनी दिली.सध्या कॅनॉल आटल्याने उरुळी कांचन शहरामध्ये दिवसाआड पाणी येत आहे. वॉर्ड क्र . १ व २ मध्ये ६ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, शिदंवणे येथील सरपंच मंगल महाडीक यांनी त्यांच्या विहिरीवरून तसेच एकनाथ काळे यांनी त्यांच्या विंधन विहिरीवरून मोफत टँकर भरून देण्यास सुरुवात केली असल्याचे ग्रामपंचायत सदस्य युवराज कांचन यांनी सांगितले.पावसाने ओढ दिल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच ज्यांना टँकर सुरू करावयाचे असेल त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामसेवकांनी केले आहे. खडकवासला धरणात पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीपुरवठा उपलब्ध आहे. आषाढ वारी काळामध्ये फक्त एक ते दोन दिवस पाणी कॅनॉलमध्ये सोडण्यात येणार असून, पाणी सोडण्याबाबत अद्याप तारीख जाहीर झालेली नाही. (वार्ताहर)
उरुळी कांचनमध्ये तीव्र पाणीटंचाई
By admin | Updated: June 16, 2014 08:23 IST