सातारा : एनसीसी कॅम्पसाठी आलेल्या पुण्याच्या विद्यार्थ्याचा रविवारी सकाळी बामणोलीजवळ (ता. जावळी) कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बुडून मृत्यू झाला. कॅम्प आटोपून पुण्याला परतण्याच्या तयारीत असताना काही विद्यार्थी पोहण्यास उतरले, तेव्हा ही दुर्घटना घडली.प्रसन्न मुकुंद नाईक (वय २१, रा. चिंचवड-पुणे) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, ‘एमआयटी’ अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला तो शिकत होता. एनसीसीच्या कॅम्पसाठी या महाविद्यालयाचे सुमारे ऐंशी विद्यार्थी दोन खासगी बसमधून बामणोली, वासोटा परिसरात शुक्रवारी (दि. २०) आले होते. बामणोलीजवळ शेंबडी येथे नारायणपूरच्या अण्णामहाराज मठाच्या परिसरात राहुट्या उभारून ते राहिले होते. वासोटा किल्ल्यावर ट्रेकिंगचा अनुभव घेऊन सर्वांनी शनिवारी रात्री राहुट्यांमध्ये मुक्काम केला. रविवारी सकाळी आवरासवर करून पुण्याला परतण्याच्या तयारीत विद्यार्थी होते. कॅम्पमधील काही विद्यार्थी सकाळी नऊच्या सुमारास कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात पोहण्यासाठी उतरले. लांबीला कमी असलेला जलाशयाचा भाग त्यांनी पोहण्यासाठी निवडला होता. प्रसन्न नाईक पोहून पलीकडच्या तीरावर पोहोचला. तेथे विश्रांती घेऊन तो पुन्हा अलीकडच्या तीरावर येण्यासाठी पाण्यात उतरला. दमछाक झाल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. काही विद्यार्थ्यांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. बुडत असलेल्या प्रसन्नला घेऊन विद्यार्थी किनाऱ्यावर आले आणि तातडीने त्याला बामणोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. नंतर सर्वजण गाड्यांमधून सातारच्या खासगी रुग्णालयात आणि तेथून जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचले. परंतु प्रसन्नचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बामणोलीच्या जलाशयात बुडून पुण्याच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Updated: March 22, 2015 22:46 IST