बारामती : भिगवण (ता. इंदापूर) परिसरातील तक्रारवाडी येथील गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा १ जुलै रोजी या मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी राहुल सुरेश सपकाळे यास अटक करण्यात आली आहे. या मुलीला त्याने पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, या मुलींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या घटनेचे गुढ कायम आहे. पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याने मुलीचा जीव गेला, असा आरोप त्या मुलीच्या आईने केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी अक्षदा बाळासो पाटोळे (वय १७, रा. तरकारवाडी, इंदापूर) हरवल्याची तक्रार तिच्या आईने दिली होती. १ जुलै रोजी खालापूर पोलीस स्टेशन रायगड यांनी भिगवण पोलिसांच्या माध्यमातून अक्षदा हिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आपण त्या ठिकाणी जावे, असा तिच्या आई वडिलांना निरोप दिला. त्याप्रमाणे तिचे आई वडिल त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी तिच्या बरोबर राहुल सुरेश सपकाळे हा आढळून आला. तिच्या वडिलांनी खानापूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भिगवण पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे त्या ठिकाणी सांगण्यात आले. त्यानंतर भिगवण पोलीस ठाण्यात प्रकरणी तक्रार करण्यात आली. त्यानुसार राहुल सपकाळ याने लग्न करण्याच्या उद्देशाने अक्षदाला पळवून नेल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. इंदापूर न्यायालयात त्याला शुक्रवारी (दि. ४) हजर करण्यात आले होते. यावेळी ४ दिवसांची पोलीस कोठडी त्याला देण्यात आली. या प्रकाराची भिगवण पोलीस सखोल चौकशी करीत आहे. त्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अक्षदा हिची आई अनिता पाटोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे मुलीला जीव गमवावा लागल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, मुलगी १७ जून रोजी बेपत्ता झाली. त्यापूर्वी १६ जून रोजी सायंकाळी आरोपी राहुल सपकाळे याच्या बरोबर वाद झाला होता. त्याने ‘पोरगी मला दिली नाही तर अंजाम वाईट होईल, तुझ्या पोरीला सुट्टी नाही’ अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर अक्षदा घराबाहेर लघुशंकेसाठी गेली होती. घरात परतल्यानंतर ती घाबरलेली होती. मम्मी, पप्पा बाहेर झोपू नका, झोपल्या जागेवर मम्मी, पप्पांना खल्लास करेल, अशी धमकी त्याने दिल्याचे अक्षदा हिने घरात आल्यावर सांगितले. त्यानंतर १७ जून रोजी सकाळी साडेसहा वाजता कामावर जाण्यासाठी आम्ही दोघी निघालो होतो. यावेळी मुलगी पुढे रस्त्यावर गेली. पाठीमागून मी जाईपर्यंत त्य ठिकाणी ती नव्हती. दोन मुले आणि पिवळा स्कार्प बांधलेल्या बाईबरोबर ती गेल्याचे त्या ठिकाणी समजले. आमचा जीव वाचविण्यासाठी तिने तिचा जीव धोक्यात घालून त्याच्याबरोबर गेली. अक्षदा हरवल्यानंतर दोन दिवस मी पुणे, पिंपरी चिंचवड, लोणी काळभोर आदी ठिकाणच्या नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. त्यानंतरच ती न सापडल्याने भिगवण पोलीस ठाण्यात गेले. यावेळी पोलीस कर्मचारी रासकर त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी ‘मी ड्युटीवर नाही, राऊतकडे केस द्या,’ असे सांगितले. प्रत्यक्षात ते फोनवर बराच वेळ बोलत होते. त्यानंतर राऊत यांची भेट घेतली. त्यांनी देखील ‘माझ्याकडे केस नाही, रासकर जावा’ असे सांगून केस घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पीएसआय काळे त्या ठिकाणी आले. मुलगी मेल्यावर केस घेणार का, अशी विचारणा मी केली. तसेच, झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर काळे यांनी तक्रार दाखल करून घेतली. अक्षदाचे अपहरण झाल्याचे मी सांगितले होते. (प्रतिनिधी)
बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृत्यू
By admin | Updated: July 5, 2014 06:30 IST