पिंपरी : ३१ डिसेंबरला घडलेली घटना..., दोन दिवस उलटूनही आरोपींवर कारवाई नाही...., २ जानेवारीला युवतीचा जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न....., ३ जानेवारीला विनयभंगाचा गुन्हा दाखल....,१६ दिवस किशोरीची मृत्यूशी झुंज... १८ जानेवारीला जगाला निरोप ....१९ जानेवारीला दोषी अधिकारी निलंबित ही एखाद्या सिनेमातील घटना नाही, तर भोसरी एमआयडीसीत राहणाऱ्या वारकड कुटुंबातील पंधरावर्षीय अश्विनीबाबत घडलेली सत्यघटना आहे. या घटनेवरून महिलांच्या सुरक्षिततेबाबत केवळ गप्पा मारणाऱ्या पोलिसांनी असंवेदनशीलता स्पष्ट झाली आहे. महिलांच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवीत असल्याच्या आणाभाका पोलीस करतात. मात्र, छेडछाडीची तक्रार देण्यासाठी ठाण्यात येणाऱ्या महिलांकडेही दुर्लक्ष होत आहे. यामुळे निराश झालेल्या पंधरावर्षीय किशोरीने टोकाचा निर्णय घेतला. नववीत शिकणाऱ्या अश्विनीचे कुटुंबीय दीड महिन्यापूर्वीच इंद्रायणीनगरातील राजवाडा क्रमांक २४ येथे राहायला आले आहे. एक भाऊ असून, तो दहावीत शिकतो. वारकड यांचे एमआयडीसीतील ‘जे’ ब्लॉक येथे छोटेसे हॉटेल असून, अश्विनीचे आई-वडील दोघेही तेथेच असतात. बुधवारी, ३१ डिसेंबरला सर्वजण घरीच होते. साडेनऊच्या सुमारास बाबू नाईक, सचिन चव्हाण आणि अकीब शेख त्यांच्या घरी गेले. घरात घुसून गैरवर्तन केले. याबाबत अश्विनीने पोलिसांना कळविते असे सांगितल्यानंतर तिघांनीही तेथे गोंधळ घातला. भीतीच्या सावटाखाली असलेल्या वारकड कुटुंबीयांनी मदतीच्या अपेक्षेने रात्री साडेदहाला एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दाखल करून आरोपींना अटक करावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र, येथे त्यांना मदत करण्याऐवजी लांडेवाडी चौकीत पाठविण्यात आले. सर्व कुटुंबीय सव्वा अकरा वाजता लांडेवाडी चौकीत पोहोचले. या ठिकाणी सर्व हकिगत सांगितल्यानंतर कशीबशी रात्री पावणेबाराला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तिघा टवाळखोरांच्या दहशतीने वारकड कुटुंबीय भेदरलेल्या अवस्थेत होते. त्यांना त्वरित ताब्यात घ्यावे, अशी कुटुंबीयांची मागणी होती. मात्र, पोलिसांनी केवळ अदखलपात्र नोंद केली. शिवाय तीही जशी सांगितली तशी केली नसल्याचा वारकड कुटुंबीयांचा आरोप आहे. घरी येऊन त्रास देणाऱ्या तिघांवर कारवाई केली. याबाबत अश्विनीने १ जानेवारीला भागवत यांच्याकडे चौकशीही केली. मात्र, त्यांच्यावर अद्याप कारवाई न झाल्याचे तिला सांगण्यात आल्याचे तिच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. दरम्यान, शुक्रवारी २ जानेवारीला अश्विनीचे आई-वडील नेहमीप्रमाणे हॉटेलवर गेले, तर अश्विनी व तिचा भाऊ घरीच होते. सायंकाळी पाचच्या सुमारास अश्विनीने राहत्या घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच तातडीने तिला भोसरीतील खासगी रुग्णालयात उपपचारासाठी दाखल करण्यात आले. हा प्रकार घडल्याने जागे झालेल्या पोलिसांनी अखेर ३१ डिसेंबरला घडलेल्या प्रकाराबाबत ३ जानेवारीला दुपारी १ वाजता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर दुपारी ३ वाजता या गुन्ह्याखाली तिघांनाही अटक केली. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच अश्विनीची प्रकृती खालावत गेली. तिला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते. आमदार गोऱ्हे यांच्यासह राजकीय पदाधिकाऱ्यांसह सामाजिक संघटनांनी वारकड कुटुंबीयांची भेट घेत आर्थिक मदतही केली. (प्रतिनिधी)कारवाईसाठी मृत्यूची वाट पाहत होते का? : गोऱ्हे ४पोलिसांचा निष्काळजीपणाच युवतीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत केला. दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी तिच्या मृत्यूची वाट का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वेळेवर आरोपींना अटक केली असती, तर आज ती युवती जिवंत असती. तक्रार नोंद करण्यास टाळटाळ होत असल्यानेच अशा घटना घडत आहेत. युवतीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी केलेली घाई ही देखील संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला. दोघांना कारणे दाखवा नोटीस ४पांढरे व भागवत या अधिकाऱ्यांना निलंबित केले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
असंवेदनशीलतेमुळेच झाला युवतीचा मृत्यू
By admin | Updated: January 20, 2015 00:50 IST