अंकुश जगताप, पिंपरीअनेक पिढ्यांना फळांची गोडी देणाऱ्या शेकडो वर्षांच्या आंब्याच्या महाकाय वृक्षांना ‘भिरुड’ (स्थानिक भाषेत भुंगीर) किडीने ग्रासले आहे. हवामान बदलामुळे या किडीच्या प्रादुर्भावाने या वर्षातच हजारो वृक्ष गतप्राण झाले आहेत. वाळवीचाही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे गावातील एकामागून एक फळझाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे गावोगावी देशी फळझाडांवर कृषी, वन, सामाजिक वनीकरण विभाग, तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मागील काही वर्षांत वृक्षलागवड मोहिमेवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. त्यामुळे शहरांसह गावोगावी नवीन वृक्षांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यामध्ये बहुतांश रायवळ, विदेशी वृक्षांचे प्रमाणच अधिक असून फळझाडांचे प्रमाण नगण्यच आहे. अशा स्थितीत मागील काही वर्षांमध्ये नागरीकरणासाठी शहरी, निमशहरी भागांत शेकडो वर्षे जुन्या असलेल्या आंबा, चिंच, जांभूळ अशा देशी फळझाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच मानवी हस्तक्षेपामुळे रायवळ आंबा, जांभूळ आदी फळझाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आता असमतोल पर्यावरणामुळे अशी झाडे कीड , रोगराईला बळी पडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहेत. याचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्यातील डोंगरी व निमसदाहरित वन प्रदेशात मोडणाऱ्या मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, वेल्हा या तालुक्यांमधील झाडांना बसत आहे. एकाच वर्षात एकेका गावातील शेकडो वर्षे जुनी ४ ते ७ झाडे दगावण्याचे प्रकार घडत आहेत. जुन्या रायवळ झाडाला हजारो आंबे लगडतात. अनेक झाडांना दर वर्षी फलधारणा होते. संकरित झाडांचा आकार मर्यादित, फळे तुलनेने कमी, तसेच आडसाल उत्पन्न मिळते. त्या तुलनेत विचार करता रायवळ आंब्याच्या एका झाडापासून ५ ते १० हजार फळे मिळतात. त्यामुळे संपूर्ण शेतकरी कुटुंबाला खाण्यासाठी मनसोक्त आंबे मिळून मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होतात. मात्र, अशी मोठी झाडे अचानक वाळल्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात रायवळ आंबा खायलाही मिळत नसल्याची विदारक स्थिती गावोगावी दिसून येत आहे. जुनी झाडे जगण्यासाठी आधीच्या पिढ्यांनी घेतलेले अपार कष्ट आपल्या चुकांमुळे वाया जाऊ देऊ नका. या झाडांची काळजी घेतल्यास नवीन झाडांच्या किती तरी पट अधिक उत्पन्न मिळू शकते. घरगुती पद्धतीने भिरुड किडीचे नियंत्रण करण्यासाठी छिद्रामध्ये पेट्रोल अथवा रॉकेल ओतावे. छिद्र बोहेरून लिपावे. १ लीटर पाण्यात ४ मि.ली. क्लोरोपायरीफॉस टाकलेले द्रावण पंपाने खोड, फांदी धुऊन निघेपर्यंत फवारावे. - विनायक कोथिंबिरे, तालुका कृषी अधिकारी, मावळभिरुड हा एक प्रकारचा किडा आहे. त्याचे शास्त्रीय नाव मॅँगो स्टीमबोरर असून शेतकरी भुंगीर म्हणूनही संबोधतात. खोडामध्ये अथवा मोठ्या फांदीमध्ये छिद्र पाडून हा कीडा झाडाच्या गाभ्यापर्यंत पोहोचतो. तेथेच प्रजनन वाढते. त्यानंतर अशा अनेक किड्यांमुळे झाडाचा गाभा निकामी होतो. किडा असलेल्या छिद्राबाहेर लाकडाचा भुसा बाहेर पडलेला दिसतो. अन्नद्रव्याअभावी झाड वाळून जाण्याचा धोका असतो. भुरुड किडीचे छिद्र आढळल्यास उपाययोजना तत्काळ करावी. शक्यतो असे छिद्र मोठे करून त्यामध्ये तार खोचून किडा बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. क्लोरोपायरीफॉस, कावची भुकटी व पाणी यांचे घट्ट द्रावण करावे. या द्रावणाचा लेप किडीचा उपद्रव झालेल्या बुंध्याला, फांद्यांना लावावा. - हनुमंत घाडगे, विस्तार कृषिविद्यवेत्ता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, पुणेआमच्या शेताच्या बांधावर पूर्वजांनी लावलेली आंब्याची जुनी झाडे आहेत. त्यापासून मिळणाऱ्या फळांचा आजवर आम्हाला मनमुराद आस्वाद घेता आला. मात्र, या वर्षी अचानकच झाडाला भुंगीर आणि वाळवी लागली. काही कळण्याआधीच झाड मरून गेले. त्यामुळे आधीच्या पिढीने ही झाडे जगविण्यासाठी केलेल्या मेहनतीवर पाणी पडल्याचे दु:ख आहे. हे नुकसान कधीही भरून निघण्याजोगे नाही. - तानाजी गायकवाड, शेतकरी, जांबे, ता. मुळशी
पिढीजात फळझाडांचे ‘भिरुड’मुळे मरण
By admin | Updated: June 6, 2015 23:35 IST