ओतूर : नगर-कल्याण महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावातील नदीवरील धोकादायक पाळणा आता जीवावर बेतू लागल्याचे दिसू लागले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही साकव पूल मात्र होत नसल्याने अनास्था उघड होत आहे. गेल्या आठवड्यातच दि. २९ जानेवारी २०१७ रोजी या पाळण्यात बसून जाणाऱ्या मंगल बाबाजी लोहोट (वय ४५) ही महिला पाण्यात पडून, पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी आहे. त्यापार्श्वभूमीवर हा धोकादायक प्रवास पुन्हा अधोरेखीत झाला आहे. गावाजवळूनच पुष्पावती नदी वाहते. या नदीतून पलिकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून शेरकर मळा, तांबे मळा व लोहोटे वस्तीवरील ३० ते ३५ कुटुंबे लोखंडी पाळण्यातून सातत्याने गावात ये-जा करतात. हा पाळणा धोकादायक आहे. या गावातील स्थानिक पुढाऱ्यांनी जुन्नरचे तहसीलदार पं. समिती, जिल्हा परिषद व खासदारांकडे सातत्याने मागणी करूनही येथे साकव पूल होत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ डिंगारे गावठाणात जाण्यासाठी, शेतात जाण्यासाठी या लोखंडी धोकादायक पाळण्याचा उपयोग करतात. मधला जवळचा मार्ग म्हणून ग्रामस्थ या पाळण्याचा उपयोग करतात. दररोज सुमारे २५० ग्रामस्थ व विद्यार्थी या पाळण्याचा उपयोग करतात. (वार्ताहर)जीवघेणा प्रवास थांबवा एकदाचासाकव पुलाची मागणी अनेक वेळा केली; परंतु या वस्तीवरील, शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीला पाने पुसली जात आहे. शासनाने या मागणीची त्वरित दखल घ्यावी म्हणजे, अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत. पुलाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत नदी ओलांडण्यासाठी या पाळण्याचा वापर होत राहणारच कारण मधला जवळचा मार्ग पुष्पावती नदीला बाराही महिने पाणी असते. तरीही ग्रामस्थ या धोकादायक पाळण्यातूनच जातात.
धोकादायक पाळणा बेतू लागला जीवावर
By admin | Updated: February 4, 2017 03:54 IST