जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा मंदिरातील उत्पन्नाबाबत सहधर्मादाया आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची आजपासून (दि.२८) अंमलबजावणी सुरु झाली. मार्तंड देवसंस्थान व पुजारी यांच्या समन्वयातुन शनिवारी तहसिलदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत देवासमोर दक्षिणापेटी बसवण्यात आली. पाटील यांनी पेटीची पुजा करुण पाचशे रुपयाची नोट पेटीत टाकुन योजनेचा प्रारंभ केला. ही सीलबंद पेटी दर आठवड्याला तहसिलदार व पंचासमक्ष उघडली जाणार आहे. त्यातील उत्पन्न देवस्थान व पुजारीवर्गामध्ये प्रत्येकी पन्नास टक्याप्रमाणे वाटले जाणार आहे. पुजा अभिषेक पासासाठी पंचवीस रुपये द्यावे लागणार आहेत. देवस्थानमधील उत्पन्नाबाबत गेली अनेक वर्ष वाद होत होते. हे वाद विसरुन देवस्थानच्या विकासासाठी व भाविकांच्या सेवेसाठी एकत्रीतपणे काम करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, सुधीर गोडसे, संदीप घोणे, वसंत नाझीरकर, किशोर म्हस्के, उपनगराध्यक्ष गणेश आगलावे, माजी विश्वस्त राजेंद्र बारभाई, सुनिल असवलीकर, नितीन बारभाई, सुधाकर मोरे, किरण मोरे, सुरेश लांघी, शामराव लांघी, बाळकृष्ण दिडभाई, प्रशांत सातभाई आदी यावेळी उपस्थित होते.यानंतर देवस्थानच्या कार्यालयात झालेल्या आभारप्रदर्शन कार्यक्रमात तहसिलदार पाटील म्हणाले, आजपर्यंतच्या सर्व विश्वस्त मंडळ व पुजारीवर्गात सुसंवाद नसल्याने गैरसमज होत होते. मात्र आता सर्वांच्या सहकार्यांने या निणर्याची अंमलबजावणी होत आहे. जेजुरीच्या इतिहासातील हा सुवर्णअक्षराने लिहावा असा क्षण आहे. पुजा-यांच्या कोणत्याही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी देवसंस्थान सदैव तत्पर राहिल. यापुढे जेजुरीचे महत्व वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत असे विचार माजी विश्वस्त राजेंद्र बारभाई यांनी व्यक्त केले. यावेळी विश्वस्त संदीप घोणे, सहाय्यक पोलिस निरिक्षक रामदास शेळके यांचीही भाषणे झाली. ४मंदिरावर सोन्याचा कळस व चांदीचा गाभारा करण्यासाठी देवसंस्थानने प्रयत्न सुरु असल्याची माहिती मुख्य विश्वस्त डॉ.खंडागळे यांनी दिली. प्रशासनाला आम्ही कायमच मदत करीत आलो आहोत. गावातील काही राजकारणी मंडळींनी पुजारी व देवसंस्थानला एकत्र येऊ दिले नाही. त्यामुळे वाद होत राहिले.
खंडोबा देवस्थानात समन्वयातून दानपेटी
By admin | Updated: March 28, 2015 23:46 IST