पुणे : राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा खोऱ्यातील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाने जोर पकडलेला नाही. त्यामुळे या धरणाची पाणीपातळी खालविण्यास सुरुवात झाली असून, या धरणांमध्ये अवघे २.0४ टीएमसी पाणीसाठा उरला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच कालावधीत या धरणांमध्ये तब्बल ४.७0 टीएमसी पाणीसाठा होता. वरसगाव आणि टेमघर या दोन्ही धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा असून, शहराच्या पाणीपुरवठ्याची मदार आता खडकवासला आणि पानशेत धरणावर आहे. खडकवासला प्रकल्पातील या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे २२ जूनअखेर या चारही धरणांमध्ये ४.७0 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, या वर्षी आधीच सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यात राज्यात मॉन्सून दाखल झाला असला तरी नानोकच्या प्रभावामुळे मॉन्सूनने जोर धरलेला नाही. त्यामुळे पावसाची स्थिती चिंताजनक बनली आहे. परिणामी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण घटले असून गतवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झालेला आहे. (प्रतिनिधी)
धरणे गाठू लागली तळ
By admin | Updated: June 22, 2014 23:42 IST