पिंपरी : माता मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे गरोदर मातांना पौष्टिक आहार दिला जातो. परंतु, गरोदर मातांच्या आहाराच्या निधीवर नगरसेवकांनी डल्ला मारला आहे. मातांसाठी असणारी तीस लाखांची तरतूद आजी व माजी नगरसेवक, शिक्षण मंडळ सदस्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य विम्यासाठी वर्ग करण्यात आल्याची गंभीर माहिती उजेडात आली आहे.विद्यमान नगरसेवक व माजी नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवक, तसेच शिक्षण मंडळ सदस्यांसाठी महापालिकेने संजीवन योजना सुरू केली आहे. सदस्यांची पत्नी व दोन अपत्यांचा वार्षिक पाच लाखांचा आरोग्य विमा उतरविण्यात येणार आहे. त्यानुसार एकूण ६१८ जणांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. स्थायी समितीने माजी नगरसेवकांचाही आरोग्य विमा उतरविण्यास मान्यता दिली आहे. सर्वसाधारण सभेनेही यास मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत विद्यमान नगरसेवक व शिक्षण मंडळ सदस्यांच्या मानधनातून १० टक्के, तर माजी नगरसेवकांना २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्यानुसार १ हजार ५४३ रुपये रक्कम प्रतिवर्षी भरावयाची असून, नगरसेवकांच्या मानधनातून ही रक्कम कपात केली जाणार आहे. ही रक्कम २ लाख २१ हजार २२१ एवढी आहे. उर्वरित ९० टक्के रक्कम महापालिका प्रशासन या आरोग्य विमा कंपनीला अदा करणार आहे. ही रक्कम तब्बल २२ लाख १२ हजार २३० एवढी आहे. (प्रतिनिधी)आरोग्य विम्यासाठी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित धरून खर्चाची तूट भरून काढण्यास अर्थसंकल्पातील तरतूद वळविली आहे. ही तरतूद गरोदर माता, तसेच ५ वर्षांखालील बाळांना पौष्टिक आहारासाठी असणाऱ्या निधीतून वळविण्याचा प्रकार केला आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीतील एकाही सदस्यांनी या विषयांवर आपेक्ष घेतला नाही.
गरोदर मातांच्या निधीवर डल्ला
By admin | Updated: September 17, 2015 02:47 IST