पुणे : हिमालयाची उंची गाठणारी माणसे आज कुठल्याच क्षेत्रात राहिलेली नाही. फ्लॅटमध्ये दिसत नाहीत ते संस्कार दुष्काळी भागातील झोपडपट्टीत दिसतात. भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याची ताकद आणि गुण सहिष्णुतेमध्येच आहे. काळ कितीही बदलला, तरी चिंता करण्याचे कारण नाही. मात्र, नव्या समाजाचा पाया घडविण्याची जबाबदारी ज्येष्ठांची आहे, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे रविवारी कविवर्य नारायण सुर्वे यांचा स्मृतिदिन आणि पुरस्कार वितरण सोहळा एस. एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी निंबाळकर बोलत होते. या वेळी यशवंतराव गडाख यांचा नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी घुमान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते.डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरीचे चेअरमन डॉ. पी. डी. पाटील, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष बाळ महाले, सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष मनोहर कोलते, कार्याध्यक्ष सचिन इटकर, मुख्य मानद सल्लागार महेंद्र रोकडे व्यासपीठावर होते.जन्मापासून अनेक अडचणींना सामोरे गेलेल्या सुर्वे यांच्या मनात कटूता आली कशी नाही, असा प्रश्न करून निंबाळकर म्हणाले, ‘‘वेदनेला आशेचा किरण देणारा हा कवी होऊन गेला. आज सर्व क्षेत्रांत निराशेचे वातावरण असले,तरी भारतीय संस्कृती टिकण्याविषयी चिंता करण्याचे कारण नाही.’’ डॉ. सदानंद मोरे, मधुकर भावे, उल्हास पवार, डॉ. पी. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.प्रभाकर साळुंके (उद्योगभूषण), सुभाष कड आणि कैलास आवटे (श्रमभूषण), अशोक शीलवंत (भला माणूस), ल. म. कडू आणि प्रा. मिलिंद रथकंठीवार (साहित्य), लता ऐवळे-कदम (सनद), तानाजी वाघोले (ग्रामभूषण) यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)
सहिष्णुतेमुळे संस्कृती टिकेल
By admin | Updated: September 14, 2015 04:44 IST