पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्काराचा ठराव दप्तरी दाखल केल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेसचा निषेध करीत भाजपा सेनेने महापालिका सभेत आज आंदोलन केले. मनसेने त्यांच्यावर वरताण करीत कात्रज तलावात बोटिंग सुरू करावे, या मागणीसाठी सभागृहात एक बोटच आणली. या तिन्ही पक्षांचा जोर लक्षात घेत राष्ट्रवादी व काँग्रेसने सभा तहकुबीचा आधार घेत त्यांच्यासमोर माघार घेतली. विविध पक्षांच्या नगरसेवकांच्या गोंधळामुळे सभेत आज रणकंदन माजले. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी सभा तहकुब झाली.पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्याचा ठराव भाजपाच्या मंजूषा नागपुरे यांनी दिला होता. भाजपा, सेना व मनसेचे गटनेते अनुपस्थित असलेल्या दिवशी राष्ट्रवादी व काँग्रेसने हा ठराव दप्तरी दाखल केला. त्याचा जोरदार निषेध करायचा, असे ठरवूनच भाजपा-सेनेचे पदाधिकारी आज सभागृहात आले. त्यांच्या हातात काँग्रेस व राष्ट्रवादीचा निषेध करणारे फलक होते. सभागृहात एकत्रित प्रवेश केल्यानंतर भाजपाचे गटनेते गणेश बीडकर यांनी निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. या गोंधळातच महापौरांनी सभागृहाचे कामकाज सुरू करीत श्रद्धांजलीच्या ठरावाचे वाचन केले. दरम्यान मनसेच्या सदस्यांनी अचानक कात्रज तलावात बोटिंग सुरू झालेच पाहिजे, अशा घोषणा देत सभागृहात प्रवेश केला. थर्माकोलपासून तयार केलेल्या एका बोटीत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे बसले होते. रूपाली पाटील ठोंबरे व अन्य सदस्यांनी ही बोट दोरीने ओढत सभागृहात आणली. मनसेच्या सर्वच सदस्यांनी कात्रज तलावात बोटिंग सुरू झालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यांच्या आवाजापुढे भाजपा-सेना सदस्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दबून गेल्या. दरम्यान मनसेच्या सदस्यांनी महापौरांच्या आसनाच्या अगदी जवळ त्यांची बोट उचलून नेली व त्यांच्या समोरच्या टेबलवर ती ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. भाजपा, सेनेच्या निषेधाच्या व मनसेच्या बोटिंग सुरू झालेच पाहिजेच्या घोषणा तारस्वरात सुरू होत्या. त्याचवेळी विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी उपमहापौर आबा बागुल यांच्यामार्फत महापौरांकडे तहकुबीची सूचना दिली. या सूचनेकडे महापौरांचे लक्ष वेधत त्यांनी आमच्या तहकुबीच्या सूचनेचे काय झाले, अशी मोठ्या आवाजात विचारणा केली. काश्मिर येथे हुतात्मा झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांना आदरांजली म्हणून सभा तहकूब करण्याची ही सूचना मंजूर झाली व राष्ट्रगीत सुरू करीत सभागृह तहकूब करण्यात आले.सभेनंतर पत्रकारांशी बोलताना महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पुरंदरे यांच्याबद्दल आम्हालाही आदर आहे; मात्र महापालिकेने त्यांना यापूर्वी मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे, असे स्पष्ट केले. त्यांच्या नावाचा काही विशिष्ट पक्ष वापर करीत असून ते अयोग्य आहे, असे ते म्हणाले. सभागृह नेते बंडू केमसेही या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर महापौर या नात्याने आपण त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठवले होेते व ते पुरेसे आहे, असेही ते म्हणाले.विविध पक्षांच्या नगरसेवकांकडून घातल्या जाणाऱ्या गोंधळामुळे सलग दुसऱ्या दिवशी पुणे महापालिकेची सभा तहकूब करण्यात आली. शहरात कचऱ्यासह अनेक प्रश्न गंभिर असताना त्याकडे नगरसेवकांनी दूर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.
महापालिकेत गदारोळ
By admin | Updated: November 21, 2015 04:09 IST